भारतानं चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावली, ‘ही’ होती पराभवाची पाच मोठी कारणं

Ind vs Aus ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई वनडेत भारतीय संघाला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतानं तीन सामन्यांची मालिका १-२ ने गमावली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी २७० धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण टीम ४९.१ षटकात २४८ धावांवर गारद झाली.

या पराभवामुळे टीम इंडियाला दुहेरी धक्का बसला आहे. पहिला म्हणजे भारतीय संघानं तीन सामन्यांची वनडे मालिका १-२ नं गमावली. त्याचवेळी एकदिवसीय संघांच्या क्रमवारीतही भारतीय संघाची पहिल्या क्रमांकावरून घसरण झाली.

भारतीय संघाला चार वर्षांनंतर मायदेशात एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी मार्च २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारतीय संघाच्या मालिकेतील पराभवामागे अनेक मोठी कारणं होती. चला जाणून घेऊया त्या पाच मुख्य कारणांबद्दल ज्यांच्यामुळे टीम इंडियाच्या हातून एकदिवसीय मालिका निसटली.

टॉप ऑर्डरची निराशाजनक कामगिरी : भारतीय संघाच्या मालिका पराभवाचं सर्वात मोठे कारण म्हणजे टॉप ऑर्डरचा फ्लॉप शो. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं ज्या प्रकारे मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले होते ते खूपच निराशाजनक होतं. पहिल्या सामन्यातही भारतीय संघाची अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, पण त्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. तिसऱ्या सामन्यात भारताला चांगली सुरुवात झाली, पण महत्त्वाच्या क्षणी विकेट्स गमावल्या आणि सामना हाताबाहेर गेला.

सूर्यकुमार यादवचा ट्रिपल गोल्डन डक : श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडून या मालिकेत चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र तिन्ही डावांत त्याला एकही धाव करता आली नाही. तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. सूर्याला मुंबई आणि विशाखापट्टणम वनडेत मिचेल स्टार्कनं बाद केलं. त्याचवेळी चेन्नई वनडेत अॅश्टन अगरने त्याला बाद केले. चेन्नई वनडेत सूर्यकुमार यादवला सातव्या क्रमांकावर पाठवलं होतं, पण हा प्रयोगही फसला.

ऑस्ट्रेलियाची अखेरची फळी : तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं एका वेळी १३८ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर त्यांना २०० धावांचा टप्पाही गाठता येणार नाही असं वाटत होतं, पण अॅलेक्स कॅरी, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट आणि अॅश्टन अॅगर या खेळाडूंनी मिळून भारतीय संघाला अडचणीत आणलं.

प्रथम, अॅलेक्स कॅरी आणि मार्क स्टॉइनिस (२५) यांच्यात सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानं शॉन अॅबॉट (२६) आणि अॅश्टन अगर (१७) यांच्यात आठव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. नंतर मिचेल स्टार्क आणि अॅडम झम्पा यांनी शेवटच्या विकेटसाठी २२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

शॉट सिलेक्शन : खराब शॉट सिलेक्शननंही भारतीय संघाला या मालिकेत नेलं. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी लेगस्पिनर अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर अटॅकींग खेळण्याचा प्रयत्न केला, त्याचा फटका त्याला सहन करावा लागला. केएल राहुलनं झम्पाच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तो लाँगऑनवर झेलबाद झाला.

त्याचवेळी झम्पानं या फिरकी गोलंदाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजालाही महत्त्वाच्या प्रसंगी बाद केलं. विराट कोहलीनंही अॅश्टन एगरच्या चेंडूवर ज्या प्रकारचा फटका खेळून आपली विकेट फेकली, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. कर्णधार रोहित शर्मानंही असा पुल शॉट खेळला ज्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव होता.

प्रयोगही जड : भारतीय संघानं निर्णायक सामन्यातही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर उतरला होता, पण इथे त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. या तिसऱ्या सामन्यात केएल राहुल चौथ्या क्रमांकावर आणि अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आले. अक्षर पटेलला उतरवण्याचा उद्देश लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तयार करणं होतं. पण संघाचा हा प्रयत्नदेखील फसला. अक्षर केवळ दोन धावा करून धावबाद झाला.