India ODI Squad SA: रोहित शर्मा वन डे मालिकेलाही मुकणार?; फिटनेस टेस्टमध्ये अजूनही झाला नाही पास, पाहा कोणाला संधी मिळणार

India ODI Squad SA: भारतीय संघानं कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेत पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ तीन वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. त्यासाठी आज किंवा उद्या संघ जाहीर होण्याची शक्यता आहे.

कसोटी मालिकेला रवाना होण्यापूर्वी रोहित शर्माला ( Rohit Sharma) दुखापत झाली आणि त्यानं मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर तो पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. पण, अजूनही त्याला फिटनेस टेस्ट पास करता न आल्यानं त्याचे वन डे मालिकेत खेळणेही संभ्रमात आहे.

वन डे मालिका सुरू होण्यास १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही निवड समितीनं अद्याप संघ जाहीर केलेला नाही. नव नियुक्त कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरूस्तीसाठी हा निर्णय लांबवणीवर पडला आहे. पण, त्यानं प्राथमिक चाचणी पास केली आहे आणि अद्याप त्याची अंतिम फिटनेस टेस्ट झालेली नाही.

''रोहित शर्मा तंदुरूस्तीच्या आसपास आला आहे, परंतु त्याच्या पुनरागमनाची घाई आम्हाला करायची नाही. तो महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यानं NCAची प्राथमिक चाचणी पास केली आहे, परंतु अजूनही आम्ही १०० टक्के तंदुरूस्तीची प्रतीक्षा करतोय. पुढील २४ तासांत आम्ही अंतिम निर्णय घेऊ,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

रोहित शर्मा वन डे मालिका मुकल्यास त्याच्या जागी लोकेश राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात येईल. लोकेश सध्या मर्यादित षटकांच्या संघाचा उप कर्णधार आहे. लाहुलनं नेतृत्वगुण शिकावेत अशी बीसीसीआयची इच्छा आहे.

''सध्याच्या घडीला रोहितची तंदुरूस्ती प्राधान्य आहे, परंतु त्याच्या गैरहजेरीत लोकेश राहुल आहेच. त्याच्या मदतीला विराट संघात आहेच. त्यामुळे रोहित या मालिकेला मुकला तरी काही समस्या उद्भवणार नाही,''असेही सूत्रांनी सांगितले.

रोहित शर्मासह अक्षर पटेल, इशान किशन, युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार हेही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी दाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तेही शर्यतीत आहेत.

दरम्यान, विजय हजारे ट्रॉफी गाजवणाऱ्या वेंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर निवड समितीचे विशेष लक्ष आहे. ऋतुराजनं ५ सामन्यांत ४ शतक झळकावताना १५०.७५च्या सरासरीनं ६०३ धावा केल्या आहेत. वेंकटेशनंही ७०च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

सलामीवीर शिखर धवन या स्पर्धेत अपयशी ठरला, तरीही निवड समिती त्याचा वन डे मालिकेसाठी विचार करेल. २०२१मध्ये वन डेत भारताकडून सर्वाधिक धावा धवननं केल्या आहेत. हार्दिक पांड्याचा विचार होणे शक्यच नाही.