Join us  

India vs England : अजिंक्य रहाणेला डच्चू, तर जसप्रीत बुमराहला विश्रांती; पाचव्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची रणनिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 12:50 PM

Open in App
1 / 8

India Playing XI; India vs England 5th Test: भारतानं पन्नास वर्षांनी ओव्हलवर कसोटी सामना जिंकून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाचे संपूर्ण लक्ष मँचेस्टर येथे १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पाचव्या व अंतिम कसोटी सामन्यावर आहे.

2 / 8

या सामन्यात कर्णधार विराट कोहली काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आणि त्याचा पहिला फटका उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाच ( Ajinkya Rahane) बसण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय टीम इंडिया फॉर्मात असलेल्या गोलंदाजाला विश्रांती देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत टीम इंडियात दोन महत्त्वाचे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

3 / 8

विराट कोहली अँड कंपनीला १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे टीम इंडिया मँचेस्टर कसोटीत कोणतीच चूक करू इच्छित नाही. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी अजिंक्यला पाठिंबा दिला आहे आणि मँचेस्टर कसोटीतील कामगिरीचा अजिंक्यच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात येईल असे संकेत देण्यात आले आहेत. अजिंक्यच्या जागी अंतिम ११मध्ये हनुमा विहारी किंवा सूर्यकुमार यादव यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

4 / 8

अजिंक्य रहाणे हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, परंतु इंग्लंडमध्ये त्याची बॅट थंडावली आहे. मागील ७ डावांमध्ये त्याला १५.५७च्या सरासरीनं १०९ धावाच करता आल्या आहेत आणि ६१ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. या मालिकेत त्याला तीनवेळा एकेरी धावसंख्या केली आणि त्यात दोन भोपळ्यांचा समावेश आहे.

5 / 8

हनुमा विहारी हा सक्षम पर्याय आहे. मे महिन्यापासून तो संघासोबत तिथेच आहे. पण, त्याचीही इंग्लंडमधील कामगिरी समाधानकारक नाही. कौंटी सामन्यात त्यानं येथे ०,८, ३२, ५२, ८ व ० अशी कामगिरी केली आहे. तर सराव सामन्यात त्याला २४ व ४३* धावा करता आल्या आहेत. अशात सूर्यकुमार यादवची बाजू भक्कम होते. रणजी करंडक स्पर्धेतील त्याची कामगिरी पुरेशी बोलकी आहे.

6 / 8

ओव्हल कसोटीत लंच ब्रेकनंतर ६-३-६-२ अशी जबरदस्त स्पेल टाकून बाजी पलटवणाऱ्या जसप्रीत बुमराहला पाचव्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. या मालिकेत भारताकडून त्यानं सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत. आगामी आयपीएल व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता संघ व्यवस्थापन त्याला पाचव्या कसोटीत विश्रांती देण्याच्या तयारीत आहे.

7 / 8

मोहम्मद शमीला चौथ्या कसोटीत विश्रांती दिली गेली होती आणि त्याच्या जागी उमेश यादव खेळला होता. उमेशनं चौथ्या कसोटीत सहा विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराहच्या जागी शमीचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे किंवा टीम इंडिया आर अश्विनला घेऊन दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरू शकते.

8 / 8

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन ( India Playing XI – IND vs ENG 5th Test) - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी/सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी/आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअजिंक्य रहाणेजसप्रित बुमराहविराट कोहली
Open in App