Join us  

India T20 WC Squad: हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी सोपवणार; BCCI अष्टपैलू खेळाडूचं प्रमोशन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 6:55 PM

Open in App
1 / 7

India T20 WC Squad : दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) खेळाचा दर्जा प्रचंड उंचावलेला पाहायला मिळतोय.. यूएईत झालेल्या मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत फिट नसतानाही हार्दिकला खेळवल्याने चौफेर टीका झाली होती. पण, त्यानंतर त्याने कसून मेहनत घेतली आणि दमदार पुनरागमन केले. आता त्याच्याकडे भारताच्या ट्वेंटी-२० संघाची मोठी जबाबदारी सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

2 / 7

दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्याने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व सांभाळले अन् पहिल्याच प्रयत्नात जेतेपदही पटकावले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हार्दिक कमाल करताना दिसतोय. विशेषतः त्याच्या गोलंदाजीची धार अधिक तीव्र झालेली पाहायला मिळतेय. त्यामुळेच BCCI ने त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 7

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिककडे उप कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या मालिकेत त्याने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत तो टीम इंडियाचा कर्णधार होता आणि भारताने ही मालिका जिंकलीही. त्यात लोकेश राहुलचे वारंवार दुखापतग्रस्त होणे हार्दिकच्या पथ्यावर पडताना दिसतेय.

4 / 7

पुनरागमनानंतर हार्दिकने आयपीएल २०२२त १५ सामन्यांत ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आणि ८ विकेट्सही घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर त्याने १२ सामन्यांत ३१.५२च्या सरसरीने २५३ धावा केल्या आणि ८ विकेट्सही घेतल्या. सध्या सुर असलेल्या विंडीजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याच्या नावावर दोन विकेट्स आहेत.

5 / 7

हार्दिक पांड्याकडे भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे उप कर्णधारपद कायमचे सोपवण्याचा विचार सुरू झाला आहे. लोकेश राहुलच्या जागी हार्दिक भविष्यात भारताचा उप कर्णधार असू शकतो. InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या उप कर्णधारपदी हार्दिकची निवड केली जाऊ शकते.

6 / 7

''हार्दिक पांड्या हा वर्ल्ड क्लास खेळाडू आहे आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त होणे, ही आनंदाची गोष्ट आहे. संघाच्या उप कर्णधारपदी त्याची निवड करणे हे निवड समितीच्या हातात आहे, परंतु तो लीडरच आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने तो दोन्ही परिस्थिती चांगल्या जाणतो. आयपीएलमध्ये त्याने त्याचे नेतृत्व कौशल्य दाखवले आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

7 / 7

हार्दिककडे ट्वेंटी-२० सघांचे उप कर्णधारपद दिले जाणार असले तरी लोकेश राहुलकडे वन डे व कसोटी संघाचे उप कर्णधारपद कायम असणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश कर्णधार असेल, तर जसप्रीत बुमराह उप कर्णधार असेल.

टॅग्स :हार्दिक पांड्याट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१लोकेश राहुलरोहित शर्माबीसीसीआय
Open in App