IND vs AFG: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात दिसू शकतात 'हे' ३ महत्त्वाचे बदल

रोहित शर्मा संघासाठी घेऊ शकतो मोठे निर्णय

Rohit Sharma Team India Changes in Playing XI: भारतीय संघ आज अफगाणिस्तान विरूद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना खेळणार आहे. भारताने पहिले दोन सामने आधीच जिंकले असून २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.

भारताने मालिकेतील दोनही सामने ६ गडी राखून जिंकले. अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात १५ चेंडू राखून तर दुसऱ्या सामन्यात २६ चेंडू राखून पराभव स्वीकारावा लागला.

भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या सामन्यात १५० पार धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग केला. पण गोलंदाजीच्या आघाडीवर भारताला अपेक्षित यश मिळाले नसल्याने आजच्या सामन्यात तीन बदल केले जाण्याची शक्यता आहे.

भारताचा दमदार गोलंदाज रवि बिश्नोई हा चांगली कामगिरी करत आहे, पण टी२० विश्वचषकासाठी सर्व पर्याय तपासून पाहण्याचा व्यवस्थापनाचा विचार करता आहे. त्यामुळे बिश्नोईच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते.

भारताचा उदयोन्मुख विकेटकिपर जितेश शर्मा दमदार कामगिरी करत आहे. यष्टीरक्षकाची भूमिका योग्य रितीने पार पाडत असतानाच तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे. पण भारताने आधीच मालिका जिंकलेली असल्याने आजच्या सामन्यात त्याला विश्रांती देऊन त्याजागी संजू सॅमसनला खेळवले जाऊ शकते.

संघातील तिसरा बदल हा वेगवान गोलंदाजीत होऊ शकतो. मुकेश कुमार हा नवखा वेगवान गोलंदाज आहे. पण गेल्या दोन सामन्यात त्याला आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत मुकेश कुमारच्या जागी भारताकडून आवेश खानला संधी दिली जाऊ शकते.