ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताने गोलंदाजी, फलंदाजी अन् क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने ५ विकेट्स राखून पहिली वन डे जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेले २७७ धावांचे लक्ष्य ४८.४ षटकांत पार केले. मोहम्मद शमीने ५१ धावांत ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला २७६ धावांवर ऑल आऊट केले. त्यानंतर शुबमन गिल ( ७४) व ऋतुराज गायकवाड ( ७१) यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी १४२ धावांची भागीदारी केली.
श्रेयस अय्यर दुर्दैवी ठरला अन् रन आऊट होऊन माघारी परतला. पण, सूर्यकुमार यादव ( ५०), कर्णधार लोकेश राहुल ( ५८*) यांनी सामना संपवला. १९९६ नंतर भारताने प्रथमच मोहाली येथील वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.
नुकताच आशिया चषक जिंकून आलेल्या भारताला सूर्यकुमार यादव फॉर्मात आल्याने मोठा दिलासा मिळाला. या विजयासह भारताने वन डे क्रमवारीत नंबर १चा किताब मिळवला. ११६ रेटींग पॉईंटसह टीम इंडिया आता अव्वल स्थानी आहे आणि त्यांनी पाकिस्तानला ( ११५) दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.
भारतीय संघ वन डे, ट्वेंटी-२० व कसोटी क्रमवारीत एकाच वेळी नंबर १ झाला आहे आणि असा पराक्रम करणारा तो आशियातील पहिलाच संघ ठरला आहे. जगात दक्षिण आफ्रिकेने असा पराक्रम केला होता आणि त्यानंतर आता भारताचं नाव या अनोख्या विक्रमावर नोंदवले गेले आहे.
भारतीय संघाला हे नंबर १ ताज टिकवणे अवघड असणार आहे, कारण ऑस्ट्रेलियाने दुसरी वन डे मॅच जिंकल्यास पाकिस्तान पुन्हा नंबर १ बनेल.