भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून अखेरची कसोटी खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
या मालिकेत खेळपट्टी नेहमीच चर्चेत राहिली आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या खेळपट्टीबाबत बराच गदारोळ झाला होता. पहिल्या तीन सामन्यांच्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना अधिक फिरकी मिळत होती, त्यामुळे सर्व सामने तीन दिवसांत संपले.
अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक खेळपट्टी काळ्या मातीपासून तर दुसरी लाल मातीपासून तयार करण्यात आली आहे, अहमदाबादची खेळपट्टी बॅट आणि बॉल या दोन्हीसाठी अनुकूल असेल, अशा माहिती समोर येत आहेत.
अहमदाबाद कसोटी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारत चौथी कसोटी खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया मालिका २-२ अशी बरोबरी करण्यासाठी खेळणार आहे.
इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला ९ विकेट्सने पराभूत केले. इंदूर स्टेडियमची खेळपट्टी कांगारूंनी भारतीय संघापेक्षा चांगली वापरली आणि त्यांच्यापेक्षा चांगली चाचणी घेतली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशा स्थितीत अहमदाबाद कसोटीपूर्वीही ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीचे कसून परीक्षण करत आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ चा चौथा आणि अंतिम कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार, ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.