दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र काल संघ्याकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव पत्करावा लागला.
या सामन्यामध्ये भारतीय संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करत असताना कर्णधार हरमनप्रीत कौर धावचीत झाली. ही विकेट भारताच्या पराभवाचं मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे. मात्र हरमनप्रीत कौरचं धावचित होणंच नाही तर इतर काही कारणांमुळे भारतीय संघाच्या पराभवाचा पाया रचला. या चुका पुढीलप्रमाणे सांगता येतील.
भारतीय संघाने गोलंदाजी करताना खूप खराब सुरुवात केली होती. पॉवर प्लेमध्ये भारतीय संघ एकही विकेट घेऊ शकला नाही. तसेच या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने बिनबाद ४३ धावा केल्या. या भक्कम सुरुवातीमुळेच ऑस्ट्रेलियाला १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर बेथ मुनी हिने ३७ चेंडूत ५४ धावा कुटल्या.
भारतीय महिला संघाचं क्षेत्ररक्षणही सुमार झालं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन सोपे झेल सोडले. पहिल्यांदा नवव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक ऋचा घोषने ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगचा झेल सोडला. तेव्हा ती केवळ एका धावेवर खेळत होती. नंतर तिने २५ धावांची खेळी केली.
तर दहाव्या षटकामध्ये भारताकडे आणखी एक झेल टिपण्याची संधी आली होती. राधा यादवच्या चेंडूवर बेथ मुनी हिने एक उंच फटका खेळला. मात्र शेफाली वर्माने हा सोपा झेल सोडला. त्यावेळी मुनी ३२ धावांवर खेळत होती. तिने आपल्या डावामध्ये ५४ धावा काढल्या. जर हे दोन झेल पकडले गेले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं.
भारतीय संघाकडून झालेली आणखी एक चूक म्हणजे भारतीय संघाने १८ व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाजीवर अंकुश ठेवला होता. १८ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १४२ धावा काढल्या होत्या. मात्र शेवटच्या २ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने ३० धावा कुटल्या. १९ व्या षटकात शिखा पांडेने १२ धावा दिल्या. तर रेणुका सिंह हिने शेवटच्या षटकात १८ धावा दिल्या. या धावाच अखेरीस भारतीय संघाला महागात पडल्या.
१७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला २० षटकांत ८ बाद १६७ धावाच काढता आल्या. अखेरच्या षटकांत भारतीय संघाला १६ धावांची गरज होती. मात्र तेवढ्या धावा काढणे भारतीय संघाला शक्य झाले नाही. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्स यांनी केलेल्या झुंजार खेळी व्यर्थ गेल्या.