एकच फायनल, ती सुद्धा इंग्लंडमध्येच का? WTC फॉर्मॅट आणि पद्धतीवरून आयसीसीला घेरले

India vs Australia Test:

आयसीसीने आतापर्यंत दोनवेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा भरविली आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदा याची सुरुवात झाली. त्याची पहिली फायनल २०२१ मध्ये झाली. तर दुसऱ्या स्पर्धेची फायनल काल संपली आहे. ही टुर्नामेंट दोन वर्षांपर्यंत सुरु असते, आणि त्यात अव्वल ठरलेले दोन संघ एका टेस्टमध्ये एकमेकांना भिडतात. जिंकणाऱ्या टीमला ही ट्रॉफी दिली जाते.

दोन्ही स्पर्धांमध्ये अंतिम सामन्याचा निकाल लागलेला आहे. योगायोग असा की दोन्ही सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे. पहिल्या टुर्नामेंटमध्ये न्यूझीलंड तर दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी जिंकली आहे. असे असताना आता ही फायनल एकाच सामन्याची कशाला, इंग्लंडमध्येच कशाला असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा तिसरा 2023-25 सीझन सुरु झाला आहे. याची फायनल देखील इंग्लंडमध्येच होणार आहे. लॉर्डस्च्या मैदानावर ही फायनल खेळविली जाणार आहे. दोन वर्षांची प्रदीर्घ काळातील टुर्नामेंट आणि तिचा निकाल लावण्यासाठी एकच फायनल यावरून आता क्रिकेटपटुंनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी आयसीसीला प्रश्न विचारले आहेत. दोन वर्षांत सहा सहा टेस्ट सिरीज खेळून फायनलमध्ये जायला मिळते, परंतू त्यांच्यावर फायनलमध्ये अन्याय कशासाठी केला जातो? दोन्ही संघांमध्ये एकच फाय़नल का खेळविली जातेय अशा प्रश्नांना आयसीसीने अद्याप उत्तर दिलेले नाहीय.

फायनलसाठी दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळवावेत अशी मागणी करण्यात येत आहे. दोन वर्षे खेळून एकच मॅच खेळविली तर संघांकडून चुका होऊ शकतात. यामुळे हरल्यामुळे दोन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरते. जर तीन टेस्टची सिरीज झाली तर उरलेल्या दोन सामन्यांमध्ये पुन्हा परतण्याची संधी असते.

पराभवानंतर रोहितनेही यावर भाष्य केले आहे. तीन सामने ठीक आहेत, परंतू यासाठी वेळ आहे का? एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमना समसमान संधी द्यायला हव्यात. दोन वर्षे मेहनत घेऊन एक संधी मिळते. यामुळे तुम्ही टेस्टच्या मोमेंटममध्ये जाऊ शकत नाही. टेस्ट क्रिकेट रिदम आणि मोमेंटम मिळविण्याची असते. पुढील स्पर्धेत तीन मॅचची सिरीज चांगली पडेल, असे रोहित म्हणाला.

याचबरोबर दरवेळी इंग्लंडमध्येच का असा प्रश्नही रोहितने उपस्थित केला आहे. वर्षात केवळ जूनच असा महिना नाहीय ज्यावेळी WTC फायनल खेळविली जाईल. ही फेब्रुवारी, मार्चमध्ये देखील खेळविता येऊ शकते. WTC फायनल फक्त इंग्लंडमध्येच नाही तर जगभरात कुठेही खेळविली जाऊ शकते, असे रोहित म्हणाला.