India vs Australia : कप्तान कोहलीची कमाल, धोनी-गांगुलीला नाही जमले ते विराटने करून दाखवले

Virat Kohli News : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिकेतील विजयाबरोबरच विराट कोहलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत टी-२० मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या लढतीत भारताला निसटता पराभव पत्करावा लागला. अन्यथा या मालिकेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची संधी भारताकडे होती.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिकेतील विजयाबरोबरच विराट कोहलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मात देणारा भारताचा आणि आशियामधील पहिला कर्णधार ठरला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत केले होते. त्याच दौऱ्यात एकदिवसीय मालिकेमध्येही भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभवाचा धक्का दिला होता. तर यावर्षी टी-२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने नमवले.

भारताने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० मालिका बरोबरीत सोडवली होती. तर यावेळी मालिकेत विजय मिळवला आहे. याआधी भारताने २०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत ३-० अशा फरकाने पराभूत केले होते. तर २००८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेत पराभूत केले होते.

मात्र धोनीला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. २०११-१२ च्या दौऱ्यात तसेच २०१४-१५ च्या दौऱ्यात धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते.

मा्त्र धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००८ मध्ये जिंकलेली तिरंगी मालिका हा भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच मिळवलेला पहिला विजय होता.

एकीकडे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात तिन्ही प्रकारांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या अन्य आशियाई संघांना ऑस्ट्रेलियात अद्याप कसोटी मालिका विजय मिळवता आलेला नाही.