India vs Australia : विराट कोहली, हार्दिक पांड्या यांच्याकडूनही कोरोना नियमांचं उल्लंघन, मास्क न घालताच शॉपिंग

रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी मेलबर्न येथील रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर सुरू झालेल्या चर्चेनं भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनं नाट्यमय वळण घेतलं आहे. या पाचही खेळाडूंना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे.

एका चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ पोस्ट करून खेळाडूंच बिल भरल्याचा दावा करणारं ट्विट केलं. त्यात त्यानं रिषभ पंतनं त्याला मिठी मारल्याचा व खेळाडूंसोबत फोटो काढल्याचा दावा केला. त्याच्या या ट्विटनं चर्चा घडवली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया व BCCI यांनी तपासाला सुरूवात केली. भारतीय खेळाडूंनी बायो सुरक्षा बबल नियम मोडल्याचा दावा केला गेला. BCCIने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले.

ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्यानं तर नियमांचे पालन करणार नसाल, तर परत जा अशी धमकीच भारतीय खेळाडूंनी दिली. त्यात बीसीसीआयनंही चौथ्या कसोटीचे ठिकाण बदलण्याचा दबाव आणल्याची चर्चा आहे. या सर्व परिस्थितीत विराट कोहली ( Virat Kohli) व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनीही कोरोना नियम मोडल्याचा दावा केला जात आहे.

भारतात रवाना होण्यापूर्वी या दोघांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलं होतं आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. smh.com.au यांच्या वृत्तानुसार विराट व हार्दिक यांनी ७ डिसेंबरला एका बेबी शॉपमध्ये शॉपिंग केली आणि त्यावेळी त्यांनी मास्क घातले नव्हते. नियमानुसार दोन्ही खेळाडूंनी मास्क घालणे आवश्यक होते.

विराट व हार्दिक यांनी त्या शॉपमधील कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले आणि त्यावेळीही त्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता.

अनुष्का शर्माच्या पहिल्या बाळंतपणासाठी विराटनं रजा घेतली आणि तो मायदेशी परतला. पांड्यालाही पुत्रप्राप्ती झाली आणि मुलासाठी पांड्यानं ऑस्ट्रेलियात शॉपिंग केली.