IND vs BAN, 2nd Test :आता विक्रमी 'सिक्सर' मारण्यासाठी मैदानात उतरेल R Ashwin

एक नजर टाकुयात आर अश्विनच्या टप्प्यात असणाऱ्या ६ मोठ्या विक्रमांवर...

चेन्नई कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन याने बॅटिंगसह बॉलिंगमध्ये जलवा दाखवला.

पहिल्या कसोटी सामन्या्तील पहिल्या डावात ११३ धावांची खेळी केल्यांनंतर दुसऱ्या डावात अश्विनने ६ विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

३८ वर्षीय अश्विननं चेन्नईच्या मैदानात शेन वॉर्नच्या सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता कानपूर कसोटीत त्याला आणखी काही विक्रम खुणावत आहे. ग्रीन पार्कवर तो विक्रमी षटकार मारू शकतो.

सध्याच्या घडीला अश्विन चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. कानपूर कसोटी सामन्यात एक विकेट घेताच तो चौथ्या डावात शंभर विकेट्सचा पल्ला गाठेल. अशी कामगिरी तो भारताचा पहिला अन् क्रिकेट जगतातील सहावा गोलंदाज ठरेल.

कानपूर कसोटीत ३ विकेट्स घेताच बांगलादेश विरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावे होईल. सध्याच्या घडीला झहीर खान ३१ विकेट्स सह टॉपला आहे.

४ विकेट घेताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड अश्विनच्या नावे होईल. सध्या ऑस्ट्रेलियन जोश हेजलवून ५२ विकेट्ससह अव्वलस्थानी आहे.

शेन वॉर्नला मागे टाकून सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान होण्याची संधीही अश्विनकडे आहे. याबाबतीत मुथय्या मुरलीधरन आघाडीवर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अश्विनच्या खात्यात १८० विकेट्स आहेत. कानपूर कसोटीत ८ विकेट्स त्याच्या खात्यात पडल्या तर ऑस्ट्रेलियन नॅथन लायनला मागे टाकून तो टॉपर होईल.