हरला भारत, झळ बसली पाकिस्तानला! आशिया चषकात ओढावली नामुष्की

India vs Bangladesh Live Marathi : बांगलादेशने आशिया चषक २०२३ स्पर्धेचा विजयाने निरोप घेतला. सुपर ४ फेरीत श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागलेल्या बांगलादेशने आज टीम इंडियावर ६ धावांनी विजय मिळवला. २०१२ नंतर आशिया चषक स्पर्धेती बांगलादेशचा हा भारतावरील पहिलाच विजय ठरला.

शुबमन गिलचे शतक आज व्यर्थ गेले. त्याचे हे २०२३ मधील ५ वे शतक ठरले अन् २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५००+ व वन डे क्रिकेटमध्ये १०००+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. शुबमननंतर अक्षर पटेलने ( Axar Patel) मोर्चा सांभाळला होता, परंतु मुस्ताफिजूर रहमानने ४९व्या षटकात दोन धक्के दिले अन् बांगलादेशचा विजय पक्का केला.

शाकिब अल हसन ( ८०) व तोवहिद हृदोय ( ५४) यांनी १०१ धावांची भागीदारी केली आणि त्यामुळे ४ बाद ५९ धावांवरून बांगलादेशने ८ बाद २६५ धावांपर्यंत मजल मारली. शाकिबने ८५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ८० धावा केल्या. हृदोय ८१ चेंडूंत ५४ धावांवर झेलबाद झाला. नासूम अहमदने ४५ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४४ धावा केल्या.

रोहित शर्मा ( ०), तिलक वर्मा ( ५), इशान किशन ( ५) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल ( १९) व शुबमन गिल यांनी ८७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादव ( २६) आणि शुबमन यांनी ४५ धावांची भागीदारी केली. पण, नंतर रवींद्र जडेजाने विकेट फेकली.

शुबमनने १३३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १२१ धावा केल्या. अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर यांनी आशा जीवंत ठेवल्या होत्या. मुस्ताफिजूर रहमानने ४९व्या षटकात शार्दूलला ( ११) आणि अक्षरला ( ४२) बाद केले आणि भारताच्या हातून मॅच गेली. मोहम्मद शमीचे प्रयत्न अपुरे ठरले अन् भारताचा संपूर्ण संघ ४९.५ षटकांत २५९ धावांत तंबूत परतला.

बांगलादेशने या एकमेव विजयाच्या जोरावर सुपर ४ च्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कूच केली. भारत ४ गुण व १.७५३ नेट रन रेटसह अव्वल स्थानी राहिला आणि श्रीलंका ४ गुण व -०.१३४ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर. पण, पाकिस्तानची थेट चौथ्या क्रमांकावर म्हणजेच तळाला घसरण झाली.