सुनील गावस्कर यांच्यानंतर आता यशस्वी जैस्वालच...! २२व्या वर्षी पाडला विक्रमांचा पाऊस

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या आणि यापैकी २०९ धावा या एकट्या यशस्वी जैस्वालच्या होत्या. अन्य फलंदाजांना मिळून फक्त १८५ धावाच करता आल्या. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वाल हा भारताचा एकटा टायगर ठरला असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.

यशस्वीने २९० चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत शुबमन गिल ( ३४ ) व रजत पाटीदार ( ३२) यांचा क्रमांक येतो. दुसऱ्या डावाच्या पहिल्या सत्रात भारताला केवळ ६० धावा जोडता आल्या. शोएब बशीर, जेम्स अँडरसन व रेहान अहमद यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

वयाच्या २२व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजामध्ये यशस्वीने २०९ धावांसह चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. या विक्रमात विनोद कांबळी ( २२७ व २२४) अव्वल स्थानावर आहे, तर सुनील गावस्कर २२० धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यशस्वीने सचिन तेंडुलकरचा ( १७९ ) विक्रम मोडला.

विशाखापट्टणम येथे मयांक अग्रवाल ( २०१९) याच्यानंतर द्विशतक झळकावणारा यशस्वी पहिला भारतीय ठरला आहे. त्याने वयाच्या २३ वर्षाच्या आधी सलामीवीर म्हणून कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीत यशस्वीने ( २०९) दुसरे स्थान पटकावले. सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २२० धावा केल्या होत्या.

कसोटी क्रिकेट इतिहासात द्विशतक झळकावणारा यशस्वी ( २२ वर्ष व ३६ दिवस) चौथा युवा फलंदाज ठरला. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ ( २१ वर्ष व २५९ दिवस वि. बांगलादेश, २००२), सुनील गावस्कर ( २१ वर्ष व २७७ दिवस वि. वेस्ट इंडिज, १९७१) आणि वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट ( २१ वर्ष व २७८ दिवस वि. बांगलादेश, २०१४) हे आघाडीवर आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून द्विशतक झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला आले. मयांक अग्रवालने दोन आणि रोहित शर्मा व विराट कोहली यांनी प्रत्येकी १ द्विशतक झळकावले आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या एका डावात सर्वाधिक ७ षटकार यशस्वी जैस्वालने आज खेचले आणि रिषभ पंतचा २०२१चा चेन्नई कसोटीतील ५ षटकारांचा विक्रम त्याने मोडला.

इंग्लंडविरुद्ध कसोटी आशियाई सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालची ( २०९) खेळी ही तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली. सुनील गावस्कर यांनी १९७९ मध्ये २२१ धावा, सनथ जयसूर्याने १९९८मध्ये २१३ धावा केल्या होत्या. यशस्वीने आज पाकिस्तानच्या आमेर सोहैलचा २०५ ( १९९२) धावांचा विक्रम मोडला.