यशस्वीने डावातील पहिली धाव घेताच विराटचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाचा सर्वाधिक ६५५ धावांचा विराटचा विक्रम ( २०१६) यशस्वीने नावावर केला.
शोएब बशीरच्या षटकात यशस्वीने ३ षटकार खेचले. एका प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत सर्वाधिक ( २६ वि. इंग्लंड) षटकारांचा विक्रम त्याने नावावर करताना सचिन तेंडुलकरचा ( २५ वि. ऑस्ट्रेलिया) विक्रम मोडला. ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला.
यशस्वीने आज ३२वी धाव घेताच कसोटीत १००० धावांचा टप्पा ओलांडला. सर्वात कमी इनिंग्जमध्ये कसोटीत १००० धावा करणारा तो दुसरा ( १६ ) भारतीय ठरला. विनोद कांबळी ( १४) अव्वल स्थानावर आहे आणि यशस्वीने चेतेश्वर पुजारा ( १८), मयांक अग्रवाल ( १९) व सुनील गावस्कर ( २१) यांना मागेट टाकले.
९ सामन्यांत यशस्वीने हा टप्पा ओलांडून सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या भारतीयाचा मान पटकावला. सर डॉन ब्रॅडमन यांनी ७ सामन्यांत हा पराक्रम केला होता. यशस्वीने हर्बेर्ट शटक्लिफ, जॉर्ज हॅडली व एव्हर्टन विकेस यांच्याशी बरोबरी केली.
२३ वर्ष पूर्ण करण्याच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २९ षटकारांचा विक्रम यशस्वीने नावावर केला. त्याने विंडीजच्या शिमरॉन हेटमायर ( २७) व न्यूझीलंडच्या टीम साऊदीचा ( २४) विक्रम मोडला.