India Vs Pakistan T20 Live : Virat Kohli अखेरपर्यंत भिडला, विजयानंतर रडला; रोहित शर्माने खांद्यावर उचलून घेतला, Emotional Photo

IND Vs PAK Live T20 Scoreboard : ४ बाद ३१ धावांमुळे अडचणीत सापडलेल्या भारताला पाहून पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात उकळ्या फुटत होत्या. पण, विराट कोहली ( Virat Kohli) व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) मैदानावर शड्डू ठोकून उभे राहिले

IND Vs PAK Live T20 Scoreboard : ४ बाद ३१ धावांमुळे अडचणीत सापडलेल्या भारताला पाहून पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात उकळ्या फुटत होत्या. पण, विराट कोहली ( Virat Kohli) व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) मैदानावर शड्डू ठोकून उभे राहिले आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना यथेच्छ धुतले. या दोघांनी वैयक्तिक विक्रमांचीही नोंद केली, परंतु भारताच्या विजयासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला आणि भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

लाखभर चाहत्यांच्या उपस्थितीत झालेला हा आतापर्यंतचा भारत-पाकिस्तान यांच्यामधील थरारक सामना ठरला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश ( ४) , रोहित ( ४), सूर्यकुमार यादव ( १५) व अक्षर पटेल ( २) असे चार फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले. विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भीस्त होती.

भारताला अखेरच्या १० षटकांत ११५ धावांची गरज असताना पाहून विराटने गिअर बदलला. १२व्या षटकात मोहम्मद नवाजच्या एका षटकात त्याने तीन खणखणीत षटकार खेचले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना १५ षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. भारताला ३० चेंडूंत ६० धावा विजयासाठी हव्या होत्या.

विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त सर्वाधिक ३७४९* धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने रोहितला ( ३७४१) मागे टाकले. दरम्यान हार्दिकनेही ट्वेंटी-२०त १०००+ धावा व ५०+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ'ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे.

हॅरिस रौफ व नसीम शाह यांनी अनुक्रमे १६ व १७ वे षटक अप्रतिम टाकले. आता भारताला १८ चेंडूंत ४८ धावा हव्या होत्या. शाहीनने टाकलेल्या १८व्या षटकात विराटने १७ धावा चोपल्या आणि अर्धशतकही पूर्ण केले. विराट-हार्दिकने ७५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या.

मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या.

फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले.

२ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ विकेट्सने सामना जिंकला.

विराटने पाकिस्तानची जीरवली. विराटने ५३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. अश्विनच्या विजयी चौकारानंतर एकच जल्लोष झाला. विराटने आकाशाकडे एक बोट दाखवत सेलिब्रेशन केलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं.

हार्दिक, भुवनेश्वर, सूर्यकुमार सर्वच विराटच्या दिशेने धावले. कर्णधार रोहित शर्माने तर चक्क विराटला खांद्यावर उचलून घेतले.

पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने ( ३-३२) भारताला दमदार सुरुवात करून दिली. बाबर आजम ( ०) व मोहम्मद रिझवान ( ४) हे दोन्ही सलामीवीर १५ धावांत त्याने माघारी पाठवले. इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी डाव सावरल आणि ५० चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. ३४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५१ धावा करत अहमद बाद झाला.

हार्दिकने एका षटकात शादाब खान ( ५) व हैदर अली ( २) यांची विकेट घेतली. पुढे मोहम्मद नवाजला ( ९) त्याने बाद केले. हार्दिकने ४-०-३०-३ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. ९१ धावांवर २ विकेट्स असणाऱ्या पाकिस्तानने पुढील २९ धावांत पाच विकेट्स गमावल्या. शमीने ( १-२५) चांगली गोलंदाजी केली.

अर्शदीपने षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदीने ८ चेंडूंत १६ धावा चोपल्या, तर मसूद ४२ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा करून चांगले कमबॅक केले. Ind vs Pak live t20 Match