भारताने सर्वात मोठा विजय मिळवला, २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साई सुदर्शनही चमकला

India vs South Africa 1st ODI Live Update : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. अर्शदीप सिंग ( ५ विकेट्स) व आवेश खान ( ४ विकेट्स) यांच्या भेदक माऱ्यानंतर पदार्पणवीर साई सुदर्शन व श्रेयस अय्यर यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून विजय पक्का केला.

अर्शदीप सिंग ( ५-३७) व आवेश खान ( ४-२७) यांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिका भेदरले. अँडिले फेहलुकवायो ( ३३) आणि टॉनी डे झॉर्जी ( २८) यांनी चांगला खेळ केला. अर्शदीपने १० षटकांत ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने शेवटची विकेट घेऊन आफ्रिकेचा डाव २७.३ षटकांत ११६ धावांवर गुंडाळला.

प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर ( ५२) व पदार्पणवीर साई सुदर्शन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. श्रेयस व साई यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. भारताने १६.४ षटकांत २ बाद ११७ धावा करून विजय पक्का केला. सुदर्शन ४३ चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला हा दुसरा मोठा विजय ठरला. २००८ मध्ये इंग्लंडने नॉटिंगहॅम यथे २१५ चेंडू राखून बाजी मारली होती आणि आज भारताने २०० चेंडू राखून विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाचा ( १८८ चेंडू, सिडनी, २००२) २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. भारताने २०२२ मध्ये १८५ चेंडू राखून दिल्ली येथे आफ्रिकेला पराभूत केले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत पदार्पण करताना फिफ्टी झळकावणारा साई सुदर्शन हा भारताचा पहिला सलामीवीर ठरला. यापूर्वी लोकेश राहुलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १००, रॉबिन उथप्पाने २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८६, फैझ फजलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ५५ धावा केल्या होत्या. वन डे पदार्पणात भारताकडून ५०+ धावा करणारा साई १७वा खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत वन डे क्रिकेटमध्ये एका इनिंग्जमध्ये ५ विकेट्स घेणारा अर्शदीप सिंग हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. युझवेंद्र चहलने २०१८ मध्ये सेंच्युरियन येते २२ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.