India vs South Africa 1st test: शतक एक, विक्रम अनेक.... KL राहुलने गाजवला पहिला दिवस

केएल राहुलने अप्रतिम शतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

भारताच्या संघाने आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद २७२ धावा केल्या. सलामीवीर मयंक अग्रवालने अर्धशतक ठोकले. पण केएल राहुलने खऱ्या अर्थाने पहिला दिवस गाजवला.

केएल राहुलने सुरूवातीला शांत आणि संयमी खेळ केला. तर दुसऱ्या सत्रापासून झटपट धावा जमवण्यास सुरूवात केली. राहुलने पहिल्या दिवसअखेर नाबाद १२२ धावांची दमदार खेळी केली. २४८ चेंडूत राहुलने ही खेळी साकारली. त्याच्या खेळीत १७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राहुलच्या एका शतकाने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

१. बॉक्सिंग डे (२६ डिसेंबरला सुरू होणारा सामना) टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या खेळात सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुलने दुसरा क्रमांक पटकावला. त्याने पहिल्या दिवशी नाबाद १२२ धावा केल्या. यादीत पहिल्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग असून त्याने २००३ साली मेलबर्नमध्ये १९५ धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या क्रमांकावरील मोहम्मद अझरूद्दीनने वेलिंग्टनमध्ये १९९८ साली पहिल्या दिवशी नाबाद १०३ धावांची खेळी केली होती.

२. दक्षिण आफ्रिकेत शतक ठोकणारा केएल राहुल हा भारताचा केवळ दुसरा सलामीवीर ठरला. याआधी २००६-०७च्या आफ्रिका दौऱ्यात वासिम जाफरने शतक ठोकले होते. त्याने ११६ धावांची खेळी केली होती. परंतु, राहुल पहिल्या दिवसअखेर नाबाद १२२ धावांवर खेळत असल्याने आता, आफ्रिकेत भारतीय सलामीवीराचा सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम राहुलच्या नावे झाला आहे.

३. केएल राहुल हा इंग्लंड, विंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या चारही देशांमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला.

४. आशियाई उपखंडाच्या बाहेर सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. या यादीत सुनील गावसकर अव्वल तर विरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केएल राहुलची गेल्या काही महिन्यातील कामगिरी पाहता त्याच्याकडून चाहत्यांना अशाच खेळीची अपेक्षा होती. आता राहुल हा डाव पुढे कसा नेतो आणि आणखी किती धावा करतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.