India vs South Africa Test Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणार आहे. भारतीय संघानं या सामन्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला आहे. भारताला २९ वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, पण यंदा द्रविड-विराट कोहली ही जोडी हा इतिहास बदण्याच्या तयारीत आहेत.
राहुल द्रविडनं दक्षिण आफ्रिकेच्या कमकुवत बाजूवर हल्ला करण्याचा मास्टर प्लान तयार केला आहे. फिरकी गोलंदाजासमोर आफ्रिकन संघ नेहमी चाचपडताना दिसतो आणि त्यामुळेच द्रविड आर अश्विनसोबत योजना आखतोय. BCCIनं पोस्ट केलेल्या फोटोत द्रविडनं खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी त्यानं खेळाडूंना काही टीप्सही दिल्या.
या फोटोत महत्त्वाची गोष्ट दिसली आणि ती म्हणजे राहुल द्रविड व आर अश्विन यांच्यातला संवाद. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या फॉर्मात असलेल्या फिरकीपटूंनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली. त्यामुळे आता संपूर्ण भार हा आर अश्विनच्या खांद्यावर आहे. त्यामुळे द्रविडनं आर अश्विनसोबत बराच काळ चर्चा केली. मागच्या वेळेस अश्विन सेंच्युरियन येथे खेळला होता, तेव्हा त्यानं पाच विकेट्स घेतल्या होत्या.
सेंच्युरियनमध्ये अश्विननं पहिल्या डावात चार व दुसऱ्या डावात १ विकेट घेतली. यात त्यानं कर्णधार डीन एल्गर, एडन मार्कराम आणि क्विंटन डी कॉक या आफ्रिकेच्या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले होते.
या दौऱ्यावर विराटच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. २०१८मध्ये सेंच्युरियन येथे विराटनं १५३ धावांची दमदार खेळी केली होती. पण, विराटच्या या खेळीनंतरही भारतीय संघाला १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता त्या पराभवाची परतफेड करण्यास विराट उत्सुक आहे.
विराटसाठी हा दौरा कर्णधार म्हणून महत्त्वाचा आहेच, परंतु फलंदाज म्हणूनही त्याची कसोटी आहे. त्यानं वर्कलोडमुळे ट्वेंटी-२० संघाचं कर्णधारपद सोडले होते. मागील दोन वर्षांत त्याला आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. २०१९मध्ये तिनं बांगलादेशविरुद्ध अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.
टीम इंडियाच्या मागील आफ्रिका दौऱ्यावर विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानं ३ कसोटींत ४७च्या सरासरीनं २८६ धावा केल्या होत्या. त्यात एक शतक व एक अर्धशतक होते. पण, आफ्रिकेनं ही मालिका २-१ अशी जिंकली होती. विराटनं दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत ५ कसोटीत ५५ च्या सरासरीनं ५५८ धावा केल्या आहेत.