७ वाजता सुरू झालेला डाव ९.०४ मिनिटांनी आटोपला अन् विंडीजचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत परतला. विंडीजचे अखेरचे ७ फलंदाज अवघ्या २६ धावांचे योगदान देऊन माघारी परतले.
हार्दिक पांड्या, मुकेश कुमार व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटूंना पाचारण केले. रवींद्र जडेजाने ७ चेंडूंच्या फरकाने विंडीजच्या शिमरोन हेटमायर ( ११), रोव्हमन पॉवेल ( ४) व रोमारिओ शेफर्ड ( ०) यांना माघारी पाठवले.
मार्च २०२३ नंतर कुलदीप यादव भारताच्या वन डे संघात परतला अन् त्याने पहिल्याच सामन्यात ३ षटकांत ६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकं निर्धाव टाकली. वेस्ट इंडिजची भारताविरुद्धची वन डे तील दुसरी निचांक खेळी आहे. यापूर्वी २०१८मध्ये तिरुअनंतपुरम येथे विंडीजचा संघ १०४ धावांत माघारी परतला होता. १९९७ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये १२१ धावांत विंडीज ऑल आऊट झाले होते.
वेस्ट इंडिजमधील सर्वोत्तम कामगिरीमध्ये कुलदीप यादवने ( ४ बाद ६ धावा) बाजी मारली. त्याने भुवनेश्वर कुमारने २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ८ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ४ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत कुलदीपने ( ७) युजवेंद्र चहलशी बरोबरी केली आणि सचिन तेंडुलकरला ( ६) मागे टाकले. अनिल कुंबळे ( १०) व रवींद्र जडेजा (८) आघाडीवर आहेत.