Asia Cup स्पर्धेत रोहित शर्मा ५ मोठे विक्रम मोडणार; तेंडुलकर, जयवर्धने यांना मागे टाकणार

Asia Cup 2023 साठी भारतीय संघ कोलम्बो येथे दाखल झाला आहे. २ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला या आशिया चषक स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे.

३६ वर्षीय रोहित हा वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली २०१८ नंतर भारतीय संघ पुन्हा आशिया चषक उंचावेल अशी चाहत्यांना आशा आहे.

आशिया चषक ( वन डे) स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम रोहितला खुणावतोय... त्याने २२ सामन्यांत ७४५ धावा केल्या आहेत आणि त्याला सचिन तेंडुलकरचा ( ९७१) विक्रम मोडण्यासाठी २२७ धावांची गरज आहे.

२०१८च्या आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते आणि २०२३ मध्येही तोच करिष्मा करून रोहितला माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. स्पर्धेच्या ३९ वर्षांच्या इतिहासात आशिया चषक ( वन डे ) दोन वेळा उंचावणारा अझरुद्दीन हा एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दोन आशिया चषक भारताने जिंकले आहेत, परंतु २०१६ साली ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा झाली होती.

रोहित शर्माने २४४ वन डे सामन्यांत ३० शतकं झळकावले आहेत आणि आशिया चषकमध्ये त्याने एक शतक झळकावताच तो ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग ( ३०) याला तो मागे टाकेल आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जाईल.

रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत १६३ धावा करताच वन डे क्रिकेटमध्ये तो १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सहावा भारतीय ठरेल. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी हा पराक्रम केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित ९८३७ धावांसह जगात १५व्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत २२ सामने खेळले आहेत आणि त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याच्या सर्वाधिक २८ सामने खेळण्याचा विक्रम मोडता येणार आहे.