भारतात होणारा वन डे विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आगामी विश्वचषकाची स्पर्धा भारतात होत असल्याने टीम इंडियाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
रोहित शर्माने गुरूवारी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारताला एका दशकापासून आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळालेले नाही. भारताने शेवटच्या वेळी २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने शेवटचे आयसीसी विजेतेपद पटकावले होते. तर त्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी मायदेशात विश्वचषक जिंकला होता.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांना सांगितले की, प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी ५० षटकांचा विश्वचषक कधीच जिंकला नाही, विश्वचषक जिंकणे हे एक स्वप्न आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यापेक्षा मोठी बाब काहीही असू शकत नाही.
विश्वचषक जिंकणे ही मोठी गोष्ट आहे पण ते मिळवणे देखील खूप कठीण आहे. याबद्दल रोहित म्हणाला की, आपल्याला विश्वचषक कोण ताटात आणून देत नाही, यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल आणि २०११ पासून आम्ही इतकी वर्षे तेच करत आहोत. यासाठी आपण सर्वजण लढत आहोत.
तसेच आम्ही सर्वजण मैदानात उतरण्यासाठी आतुर आहोत कारण आपल्याला माहिती आहे की, आपल्याकडे एक चांगला संघ आहे. आम्ही सर्व खेळाडू आहोत, आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही ते करू शकतो. याचा अर्थ आम्ही हलक्यात घेत आहे असा होत नाही. २०२२ च्या विश्वचषकात आम्ही हरलो तेव्हा मी म्हटले होते की आम्ही पुढच्या विश्वचषकात आव्हान देऊ, असेही रोहितने सांगितले.
'मला प्रथम फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल. कर्णधारपद त्यानंतर येते. संघात माझी भूमिका फलंदाज म्हणून अधिक आहे. मला मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून द्यायला हवा.'
रोहितने आणखी सांगितले की, मागील वर्षी देखील आम्ही तसेच केले होते. ट्वेंटी-२० विश्वचषक होणार होता, त्यामुळे आम्ही वन डे क्रिकेट खेळले नाही. आताही आम्ही तेच करत आहोत, वन डे विश्वचषक होणार आहे त्यामुळे आम्ही ट्वेंटी-२० सामने खेळत नाही आहोत.
विराट कोहलीला ट्वेंटी-२० मालिकेत न खेळवल्याबद्दल रोहितने म्हटले की, हे विश्वचषकाचे वर्ष आहे, आम्हाला सर्वांना तंदुरूस्त राहायचे आहे. आमच्या संघात आधीच इतके दुखापतग्रस्त आहेत की आता मला दुखापतींची भीती वाटते.
आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून ५ ऑक्टोबरपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे, तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत.