भारतानं ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन ( Tim Paine) याच्याकडून नेतृत्व काढून घेण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
टीम पेननं संपूर्ण मालिकेत खेळलेल्या रडीच्या डावामुळे त्याला भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या या चुकीचा मनस्पात एका भलत्याच व्यक्तीला सहन करावा लागत आहे.
सिडनी कसोटीत आर अश्विन व हनुमा विहारी यांनी संयमी खेळ करताना ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला आणि सामना अनिर्णीत राखला होता.
सिडनी कसोटीत अश्विनची एकाग्रता मोडण्यासाठी टीम पेनसह ऑसींच्या अन्य खेळाडूंकडूनही स्लेजिंग करण्यात आली. त्याच्या या कृतीवर अश्विननंही सडेतोड उत्तर दिले. पण, पेनचं हे वागण कुणालाच आवडलं नाही आणि त्याच्यावर टीका झाली.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर २-१ असं नाव कोरल्यानंतर भारतीय चाहत्यांना सोशल मीडियावरून टीम पेनला धुण्याची हुक्की आली. पण, त्यांनी ऑसी कर्णधार समजून भलत्याच टीम पेनला नको ते सुनावले.
लंडनच्या टीम पेन ( Tim Payne) व्यक्तीला टॅग करून भारतीय चाहत्यांनी ट्रोल सुरू केले. या व्यक्तिनं ६०० हून अधिक मॅसेज आल्याचा स्क्रीन शॉट शेअऱ करून त्याचं दुखणं सर्वांसमोर मांडलं.
''मी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन आहे, असे भारतीय चाहत्यांना वाटते. त्यामुळे मला अनेकांनी ट्रोल केलं. ६०० पेक्षा अधिक मॅसेज रिक्वेस्ट आले आहेत आणि माझ्या फोटोंवर कमेंट केल्या जात आहेत,''असे या व्यक्तीनं सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन हा इंस्टाग्रामवर नाही.