ICC च्या दशकातील सर्वोत्तम पुरस्कारांत भारतीयांचे वर्चस्व; पाकिस्तानची पाटी कोरी, पाहा सर्व पुरस्कार!

दशकातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गार्फिल्ड सोबर्स पुरस्कार ( Sir Garfield Sobers Award ) जिंकला.

मागील दहा वर्षांत त्यानं वन डे क्रिकेटमध्ये १० हजाराहून अधिक धावा, ३९ शतकं व ४८ अर्धशतक झळकावली. शिवाय ११२ झेल टिपले. ''संघाच्या विजयात हातभार लावणे, हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक सामन्यात ते गाठण्याचा मी प्रयत्न करतो,'' अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.

कोहली दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, तसेच सर्वोत्तम कसोटी, वन डे व ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठीच्या पुरस्काराच्या शर्यतीत होता. पण, कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं, तर ट्वेंटी-20त अफगाणिस्तानच्या राशिद खाननं बाजी मारली.

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा मान पटकावला. त्यानं या दहा वर्षांत ६५.७९च्या सरासरीनं ७०४० धावा केल्या आणि त्यात २६ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश होता.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं ICC Spirit of Cricket Award of the Decade जिंकला. २०११च्या नॉटिंघम कसोटीत जो रूटला रन आऊट असतानाही धोनीनं खिलाडूवृत्ती दाखवून पुन्हा फलंदाजीला बोलावले होते. त्यासाठी धोनीला हा पुरस्कार मिळाला.

ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीनं महिला क्रिकेटपटूंमध्ये तीन पुरस्कार जिंकले.

दशकातील सर्वोत्तम वन डे संघ - रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शकिब अल हसन, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ - रोहित शर्मा, अॅरोन फिंच, ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), किरॉन पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ - अॅलेस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, विराट कोहली ( कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

दशकातील सर्वोत्तम महिलांचा वन डे संघ- अॅलिसा हिली, सुझी बॅट्स, मिताली राज, मेग लॅनिंग ( कर्णधार), स्टेफनी टेलर, साराह टेलर, एलिसे पेरी, डेन व्हॅन निएकर्क, मेरीझॅपे कॅप्प, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद

दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ महिला - अॅलिसा हिली, सोफी डेव्हिन, सुझी बॅट्स, मेग लॅनिंग ( कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डेंड्रा डॉटिन, एलिसा पेरी, अॅन श्रुबसोल, मीगन स्कट, पूनम यादव