Join us  

"बाबा, तुम्हाला आनंद झाला ना?", 'शतकवीर' जैस्वाल भावुक, व्हिडीओ कॉलवरून साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 5:12 PM

Open in App
1 / 10

पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा यशस्वी जैस्वाल क्रिकेट वर्तुळात सध्या चर्चेत आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या सलामीच्या कसोटी सामन्यात यशस्वीने शतकी खेळी करून नवा विक्रम नोंदवला. आयपीएल गाजवणारा यशस्वी भविष्यातील स्टार असल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे.

2 / 10

टीम इंडियात जागा मिळवण्यापर्यंतचा यशस्वीचा प्रवास फार खडतर होता. यासाठी त्याला अनेक अडथळे पार करावे लागले. जैस्वाल निवडकर्त्यांच्या अपेक्षांवर खरा ठरला ज्यांनी त्याला विंडीज दौऱ्यावर संधी दिली.

3 / 10

सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून पाहुण्या भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या बळीसाठी विक्रमी भागीदारी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

4 / 10

कधीकाळी पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघात खेळतो आहे ही अनेकांसाठी प्रेरणाच म्हणावी लागेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात संस्मरणीय शतक झळकावणाऱ्या जैस्वालने वडिलांसोबत आपला आनंद शेअर केला.

5 / 10

सामन्यानंतर यशस्वीने वडिलांसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी जैस्वालला आनंदाअश्रू आले अन् त्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. खरं तर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा तो सतरावा भारतीय ठरला आहे.

6 / 10

जैस्वालचे वडील भूपेंद्र यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'शी संवाद साधताना खुलासा करताना म्हटले, 'पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर यशस्वीने पहाटे साडेचार वाजता व्हिडीओ कॉल केला. तेव्हा तो रडत होता. मला देखील अश्रू अनावर झाले. तो खूप भावनिक क्षण होता. तो माझ्याशी जास्त वेळ बोलू शकला नाही कारण तो खूप थकला होता. त्याने मला एवढेच विचारले की, बाबा तुम्हाला आनंद झाला ना?.'

7 / 10

२१ वर्षीय यशस्वी जैस्वाल पदार्पणाच्या कसोटी सामन्यात १५० हून अधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने रोहित शर्मासोबत पहिल्या बळीसाठी २२९ धावांची विक्रमी भागीदारी केली.

8 / 10

यशस्वीने ३८७ चेंडूत १७१ धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात १५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा यशस्वी जैस्वाल पाचवा भारतीय सलामीवीर ठरला आहे.

9 / 10

जैस्वालने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करून नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने दिग्गज सुनिल गावस्कर यांसारख्या महान फलंदाजांचा विक्रम मोडित काढला. तो एकमेव सलामीवीर ठरला आहे, ज्याने पदार्पणाच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या धरतीवर शतक झळकावले आहे.

10 / 10

पदार्पणाच्या कसोटीत आतापर्यंत सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रमही यशस्वी जैस्वालने मोडला. आता हा विक्रम जैस्वालच्या नावावर आहे. जैस्वालला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ
Open in App