भारताच्या संभाव्य १९ सदस्यांपैकी १५ खेळाडूंना निवड समितीकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना वेस्ट इंडिज दौऱ्यात काही विशेष कामगिरी करता आली नाही. अशा स्थितीत १५ मध्ये दोघांची जागा दिसत नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारत १६ ते १८ खेळाडूंची निवड करू शकतो. जयदेव उनाडकट आणि शार्दूल ठाकूर यांना श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या घरच्या मालिकेत संधी मिळण्याची खात्री आहे. दुखापतग्रस्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाने भारताची स्थिती आणखी मजबूत होईल.
संघातील अतिरिक्त वेगवान गोलंदाज आणि तिसरा फिरकी गोलंदाज याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यावरून पुनरागमन करतोय. तो ८० टक्के तंदुरुस्त असला तरीही वर्ल्ड कप खेळणार आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचे खेळणेही निश्चित झाले आहे.
हार्दिक पांड्या चौथ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारणार आहे. प्रत्येक सामन्यात तो ६ ते ८ षटके टाकेल अशी अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीत राखीव वेगवान गोलंदाजाची भूमिका महत्त्वाची ठरते. शार्दूल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एक हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. शार्दूलने वेस्ट इंडिज दौऱ्यात ३ वन डे सामन्यात ८ विकेट घेतल्या.
तिसरा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलपेक्षा अक्षर पटेल अजूनही पुढे आहे. तो रवींद्र जडेजासारखा गोलंदाजी करतो. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
भारताचा संभाव्य प्राथमिक संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अक्षर पटेल, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल.