Join us  

T20 World Cup साठी भारताचे ७ खेळाडू ठरले, IPL 2024 मधून नेमकं काय अपेक्षित?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 1:41 PM

Open in App
1 / 8

देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देऊनच भारतीय संघात निवड होईल, अशा कितीही बाता मारल्या गेल्या, तरी आयपीएल ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेपेक्षा महत्त्वाची आहे, हे जगजाहीर आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर आता भारतीय संघ जूनमध्ये अमेरिका व कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर लक्ष ठेऊन आहे. त्यासाठी आयपीएलमधील खेळाडूंचा फॉर्म हा महत्त्वाचा असणार आहे.

2 / 8

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. विराट कोहलीच्या समावेशाबाबत अद्याप स्पष्टता नाही. अमेरिका व विंडीजमधील खेळपट्टी संथ असल्याने फिरकीपटू महत्त्वाचे ठरणार आहेत. पण, अजूनही टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातील ८ नाव निश्चित झालेली नाहीत आणि ही ८ खेळाडू शोधण्यासाठी आयपीएल २०२४ महत्त्वाची ठरणार आहे.

3 / 8

भारत शिवम दुबेला सतत पाठीशी घालत आहे आणि गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या जेतेपदात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतासाठी तो अष्टपैलू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि त्याची डावखुरी फलंदाजी मधल्या षटकांत खोऱ्याने धावा करण्यासाठी निर्णायक ठरू शकते. शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनीही फिरकीपटूंविरुद्ध खूप धावा केल्या आहेत, पण ते नवीन चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाजी क्रमवारीत पुढे असतील.

4 / 8

हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये राहिला तर त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही. मात्र, हार्दिकची संघात कोणती भूमिका असेल, हेही निवडकर्त्यांना पाहायचे आहे. असे झाल्यास शिवमच्या निवडीबाबत निवडकर्त्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. संघात हार्दिक आणि शिवमच्या भूमिका वेगळ्या असाव्यात असे निवडकर्त्यांना आवडेल.

5 / 8

यष्टिरक्षकाच्या जबाबदारीसाठी सध्या जितेश शर्मा एक पर्यात आहे. इशान किशन ही पहिली निवड असू शकली असती, परंतु सध्याच्या वागणुकीमुळे त्याने बीसीसीआयचा रोष ओढावून घेतला आहे. अशा परिस्थितीत जितेश आयपीएलमध्ये कसा खेळतो हे पाहावं लागेल. पण, जर रिषभ पंतचे पुनरागमन झाले, तर या दोघांपैकी एकाला बॅक अप म्हणून संघात घेतले जाईल. पण, रिषभला खेळवण्याचा निर्णय घाईचा ठरू शकतो. लोकेश राहुलने आयपीएलमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केली आणि २०२६ प्रमाणेच त्याने फलंदाजी केल्यास हाही एक पर्याय आहे.

6 / 8

१७ ते २० षटकांदरम्यान वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी करू शकणाऱ्या कोणत्याही फलंदाजाची निवड अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी रिंकू सिंग याकडे पाहिले जात आहे. तो १५ खेळाडूंमध्ये आपले स्थान सहज बनवेल, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे थोडे कठीण होऊ शकते.

7 / 8

जसप्रीत बुमराहला सोबत म्हणून संघात दोन जलदगती गोलंदाज असतील. मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार हे अलीकडच्या ट्वेंटी-२० संघांचा भाग होते. मोहसीन खान पूर्णपणे तंदुरुस्त असताना लखनौसाठी गोलंदाजी करत असेल तर निवडकर्त्यांचं त्याच्याकडे लक्ष असेल.

8 / 8

बॅकअपच्या यादीत रवी बिश्नोई, अक्षर पटेल यांच्यासह अतिरिक्त यष्टीरक्षक-फलंदाज आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज यांना ठेवले जाऊ शकते.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आयपीएल २०२४भारतीय क्रिकेट संघ