भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची खेळाडू जेमिमा रॉड्रिक्स हिची मार्च-एप्रिल महिन्यामध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. दरम्यान, विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळाल्याने निराश झालेल्या जेमिमा रॉड्रिक्स हिने सध्या क्रिकेकऐवजी हॉकी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
जेमिमाला क्रिकेटनंतर हॉकी हा खेळ आवडतो. त्यामुळे तिने हॉकी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ती लवकरच हॉकीच्या टर्फवर दिसणार आहे. भारतीय विश्वचषक संघात निवड न झाल्याने तिला धक्का बसला होता. आता ती विलिंग्डन कॅथलिक जिमखाना रिंक टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसणार आहे.
ती या स्पर्धेमध्ये अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट टीमचे प्रतिनिधित्व करणार आहे. याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये जेमिमा रॉड्रिक्स हातात हॉकी स्टिक घेतलेली दिसत आहे.
महिलांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च-एप्रिल महिन्यामध्ये न्यूझीलंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी जेमिमाला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. जेमिमा शाळेत असताना क्रिकेट आणि हॉकी हे दोन्ही खेळ खेळायची. तिने महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील तसेच मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून हॉकी खेळली होती.
जेमिमा लहानपणापासून हॉकी खेळत असल्याने ती हॉकीमध्येच आपलं करिअर घडवेल, असं जेमिमाच्या आई-वडिलांना वाटत असे. मात्र नंतर जेमिमाने हॉकी आणि क्रिकेटपैकी क्रिकेटची निवड केली.
जेमिमा रॉड्रिक्स भारताकडून २१ एकदिवसीय आणि ५० टी-२० सामने खेळली आहे. त्यात तिने अनुक्रमे ३९४ आणि १०५५ धावा केल्या आहेत.