INDW vs PAKW: सामन्यानंतर भारत-पाकिस्तान खेळाडूंच्या गळाभेटी; स्मृती मानधनाच्या कृत्यानं जिंकली मनं

ind vs pak women: काल महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला.

सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंच्या गळाभेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काल झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी चमकदार खेळी करून कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने 7 विकेट आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने सावध खेळी करून धावसंख्येचा आकडा शंभरच्या पार नेला आणि भारतासमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी केली.

तत्पुर्वी, पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना शेजाऱ्यांची सुरूवात निराशाजनक झाली. मात्र, कर्णधार बिस्माह मारूफ आणि आयेशा नीशम यांनी डाव सावरला आणि 47 चेंडूत 81 धावांची भागीदारी नोंदवली. पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 149 एवढ्या धावा केल्या होत्या.

भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून सुरूवातीपासून पकड मजबूत केली होती. मात्र, प्रतिस्पर्धी संघाची कर्णधार बिस्माह मारूफ आणि आयेशा नीशम (81) यांची भागीदार तोडण्यात भारताला अपयश आले. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात शानदार झाली. यास्तिका भाटिया (17) आणि शेफाली वर्माने (33) ताबडतोब खेळी करून पाकिस्तानवर दबाव टाकला. सामना पार पडल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी खेळभावना दाखवली.

मात्र, सलामीवीर खेळाडू बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने डाव सावरला. कर्णधार हरमनप्रीत कौर (16) धावा करून तंबूत परतली. जेमिमाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवला. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेली मराठमोळी खेळाडू स्मृती मानधना पाकिस्तानी खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसली.

भारतीय संघाने 19 षटकांत 3 बाद 151 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला. जेमिमा रॉड्रिग्ज (53) आणि रिचा घोष (31) धावांवर नाबाद राहिली. पाकिस्तानकडून नशरा संधू हिने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर सादिया इक्बालला 1 बळी घेण्यात यश आले.

मॅचविनर जेमिमा रॉड्रिग्जला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामना पार पडल्यानंतर भारतीय खेळाडूंनी स्पिरीट ऑफ क्रिकेट दाखवत पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केले आहेत.

पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वेस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग.