महिलांच्या आशिया चषकात नेहमीच भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने सर्वाधिक सातवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र, रविवारी श्रीलंकेच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताच्या वर्चस्वाला धक्का देत किताब जिंकला.
श्रीलंकेच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा पराभव करून अखेर आशिया चषक जिंकला. याआधी पाचवेळा अंतिम सामना खेळणाऱ्या श्रीलंकेला एकदाही किताब जिंकता आला नव्हता.
यंदा मात्र यजमान संघाने बाजी मारत भारताला पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने सहज विजय मिळवला. भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकांमुळे यजमानांचा विजय अधिक सोपा झाला. श्रीलंकेने ८ विकेट आणि ८ चेंडू राखून प्रथमच आशिया चषक उंचावला.
श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टूने ३ बळींसह स्पर्धेत ३०४ धावा केल्याने तिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत स्पर्धेचा प्रबळ दावेदार होता, पण क्षेत्ररक्षणातील काही चुकांमुळे यजमानांनी टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला.
माहितीनुसार, महिलांचा आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला १६,४८,००० रूपयांचे बक्षीस मिळाले, तर उपविजेत्या भारतीय संघाला १०,३०,००० रूपये मिळाले.
अंतिम सामन्यात सामनावीर राहिलेल्या खेळाडूला ८२,००० रूपये देण्यात आले, तर मालिकावीर अर्थात प्लेअर द टूर्नामेंट राहिलेल्या शिलेदाराला १,६४,००० रूपये मिळाले.
श्रीलंकेच्या धरतीवर महिलांच्या आशिया चषकाची स्पर्धा पार पडली. एकूण आठ संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात होते. भारताने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला उपांत्य फेरीत चीतपट करून फायनलमध्ये पोहोचला होता.
भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे. बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने सहावेळा अंतिम सामने खेळून अखेर यावेळी किताब जिंकण्यात यश मिळवले.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एक सोपा झेल सोडला आणि भारताच्या हातून ट्रॉफीही निसटली.