इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं आर अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आणि असा ट्रेड करण्याची 14 नोव्हेंबर ही अखेरची तारीख आहे. तोपर्यंत प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंची साथ सोडणार हे जाहीर करतील. त्यानुसार चेन्नई सुपर किंग्स केदार जाधवला करारमुक्त करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2019साठीच्या लिलावात 8.4 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आलेल्या वरूण चक्रवर्तीला किंस्ज इलेव्हन पंजाब करारमुक्त करण्याची शक्यता आहे. चक्रवर्तीला मागील मोसमात केवळ एकच सामना खेळता आला. याशिवाय पंजाब डेव्हीड मिलर, अनिकेत रजपूत आणि हार्डस विलजोइन यांनाही मुक्त करू शकतात.
मुंबई इंडियन्स बरींदर सरनची साथ सोडू शकतो. त्याला 3.4 कोटींत मुंबईनं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. मागील मोसमात त्यानं दोनच सामने खेळले, परंतु एकही विकेट न गमावता त्यानं भरपूर धावा केल्या. याशिवाय अनमोलप्रीत सिंग, इव्हिन लुईस आणि मिचेल मॅक्लेघन यांनाही डच्चू मिळू शकतो.
कॉलिन इग्रामला 6.4 कोटी रुपये देत दिल्ली कॅपिटल्सनं मोठा मोहरा गळास लावला. पण, त्याला केवळ 12 सामन्यांत 18.4 च्या सरासरीनं धावा करता आल्या. शिवाय ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो आणि जयंत यादव यांच्यावरही टांगती तलवार आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार कार्लोस ब्रॅथवेट याला कोलकाता नाइट रायडर्स डच्चू देऊ शकतो. पाच कोटींत खरेदी करण्यात आलेल्या ब्रॅथवेट गेल्या मोसमात केवळ दोनच सामने खेळला आणि केवळ ११ धावा केल्या. त्याच्यासह रॉबीन उथप्पा, पियूष चावला, रिंकू सिंग आणि जो डेन्ली यांनाही मुक्त करू शकतो.
8.4 कोटींत करारबद्ध केलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थान रॉयल्स करारमुक्त करण्याची शक्यता अधिक आहे. त्याला मागील मोसमात केवळ 10 विकेट्स घेता आल्या. त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाला बाद फेरीतही प्रवेश करता आला नाही. त्याच्यासह स्टुअर्ट बिन्नी, लिएम लिव्हिंगस्टोन, अॅश्टन टर्नर आणि धवल कुलकर्णी हेही लिलावासाठी उपलब्ध होऊ शकतात.
चेन्नई सुपर किंग्ज त्यांचा खास अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला यंदा संघाबाहेर करू शकतात. 7.80 कोटी रक्कम मोजलेल्या केदारला संघासाठी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. केदारसह अंबाती रायुडू, करन शर्मा आणि मुरली विजयही बाहेर बसू शकतात.
सनरायझर्स हैदराबाद मार्टिन गुप्तीलला यंदा डच्चू देऊ शकतात. मागील मोसमात त्याला तीन सामन्यांत 81 धावा करता आल्या होत्या. शिवाय बसील थम्पी, बिल्ली स्टॅनलॅक, सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांनाही संघ करारमुक्त करू शकतो.