IPL 2020 भारतात होणार नाही; BCCIनं दिली महत्त्वाची अपडेट!

कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द झाल्यास सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) प्रयत्न आहे. त्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्य संघटनांना तयारी करण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

संपूर्ण आयपीएल मुंबईत खेळवण्याच्याची चर्चा रंगल्या होत्या, पण आता एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा आयपीएल भारतात होणार नसल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केलं.

आयपीएलच्या आयोजनासाठी श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती यांनी तयारी दर्शवली होती आणि यापैकी एका देशात आयपीएल खेळवण्यात येईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले. पण, त्यांना ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या निर्णयाची प्रतीक्षा पाहावी लागेल.

''आयपीएल कुठे खेळवायची, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. पण, यंदा ती भारतात होणे अशक्य आहे. देशातील सद्यपरिस्थिती पाहता आयपीएल येथे खेळवणे योग्य ठरणार नाही. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं IANSशी बोलताना सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की,''संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका यांच्यात शर्यत आहे आणि आम्ही अजून त्याबाबत चर्चा केलेली नाही. कोरोना व्हायरसचा किती प्रादुर्भाव आहे, यावर सर्व अवलंबून आहे. खेळाडूंच्या राहाण्याची सोयही पाहायला हवी. त्यामुळे याबाबतचा निर्णय नंतर होईल.''

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात आयसीसीनं अनेक बैठका घेतल्या, परंतु अजूनही अंतिम निर्णय आलेला नाही. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात त्याबाबतचा निर्णय येणं अपेक्षित आहे. त्यामुळे बीसीसीआयनंही आयपीएल रद्द केलेली नाही.

आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसू शकतो.

2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, तर 2014मध्ये पहिले 20 सामने संयुक्त अरब अमिराती येथे झाले होते.