चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी कमी होईना; MI विरुद्धच्या सामन्याला महाराष्ट्राचा खेळाडू मुकणार

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. Indian Premier League ( IPL 2020) साठी दुबईत दाखल झाल्यापासून त्यांच्यासमोर रोज नवनवीन संकट आले आहे.

संघातील प्रमुख व अनुभवी खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) आणि हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यांनी वैयक्तिक कारणास्तव IPL2020तून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

त्याआधी संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) आणि ऋतुरुजा गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 11 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

त्यात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेमुळे जोश हेझलवूड आणि अष्टपैलू सॅम कूरन यांना पहिल्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यांना सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्णच करावा लागेल.

दीपक चहरने कोरोनावर मात केली असून तो सरावालाही लागला आहे. पण, पहिल्या सामन्यापूर्वी CSKची डोकेदुखी काही केल्या कमी होताना दिसत नाही.

CSKचा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला दुसरा खेळाडू ऋतुराज अजूनही बरा झालेला नाही आणि तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ( Mumbai Indians) पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. त्याच्या आणखी दोन चाचण्या होणे बाकी आहेत.

ऋतुराजला मैदानावर पुन्हा उतरण्यासाठी CSKला BCCIच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. त्याला आता फिटनेस टेस्टही द्यावी लागणार आहे, असे CSKचे मुख्या कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी सांगितले.

सुरेश रैनाच्या ( Suresh Raina) अनुपस्थितीत ऋतुराजला अंतिम 11मध्ये शेन वॉटसनसह सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता होती.

सलामीसाठी पर्याय - शेन वॉटसन, फॅफ ड्यु प्लेसिस आणि मुरली विजय; या तिघांपैकी दोघ पहिल्या सामन्यात नक्की सलामीला येतील

मुंबई इंडियन्स ( MI) आणि चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांच्यात 30 सामने झाले आणि त्यापैकी MI ने 18 विजय मिळवले आहेत. तटस्थ ठिकाणी दोन्ही संघ 10 वेळा एकमेकांना भिडले आणि दोघांनी प्रत्येकी 5-5 विजय मिळवले आहेत.

चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Players List (CSK) - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन