IPL 2021 Acution list : अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शन ( Mini-Auction) साठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.

१८ फेब्रुवारी चेन्नईत होणाऱ्या या लिलावात २९२ खेळाडूंवर बोली लागणआर आहे. आठ फ्रँचायझींनी नोंदणी केलेल्या १११४ क्रिकेपटूंमधून निवडक खेळाडूंची नावं IPLकडे सोपवली.

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings ) रिलीज केलेल्या केदार जाधव ( Kedar Jadhav) याच्यासह हरभजन सिंग, राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून डच्चू मिळालेला ग्लेन मॅक्सवेल हे सर्वाधिक मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये आहेत. केदार जाधव व हरभजन सिंग हे दोनच भारतीय खेळाडू २ कोटींच्या मुळ किंमतीच्या ( base price ) यादीत आहेत.

स्मिथ व मॅक्सवेल यांच्यासह शकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग, लिएम प्लंकेट, जेसन रॉय व मार्क वूड यासह १२ खेळाडू १.५ कोटींच्या मुळ किंमतीत आहेत. १ कोटी मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये हनुमा विहारी व उमेश यादव हे दोनच भारतीय खेळाडू आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ८ वर्षांची बंदी पूर्णकरून आयपीएल खेळण्याचे स्वप्न उराशी धरणाऱ्या एस श्रीसंत ( S Sreesanth) याच्या नावावर फ्रँयाचझींनी काट मारली आहे.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचं नाव शॉर्टलिस्टेड झालं आहे. २० लाख ही त्याची मुळ किंमत आहे.

चेन्नईत होणाऱ्या ऑक्शनमध्ये १६४ भारतीय, १२५ परदेशी क्रिकेटपटू आणि ३ संलग्न देशांच्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. दुपारी ३ वाजल्यापासून लिलावाला सुरुवात होणार आहे.

या लिलावात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाला सर्वाधिक १३ खेळाडू आपल्या ताफ्यात घ्यायचे आहेत. सनरायझर्स हैदराबादला केवळ तीन रिक्त जागा भरायच्या आहेत.

लोकेश राहुलच्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( KXIP) पर्समध्ये सर्वाधिक ५३.१ कोटी रुपये आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये २२.७ कोटी आहेत आणि त्यांना ७ खेळाडूंची जागा भरायची आहे. पंजाबला ९, तर राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाइट रायडर्सनं प्रत्येकी ८ खेळाडू घ्यायचे आहेत.