IPL 2021, Play Off qualification scenario : मुंबई इंडियन्सचा सॉलिड विजय, म्हणजे प्ले ऑफ स्थान पक्कं ना?; नाही जरा गणित समजून घ्या

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेता मुंबई इंडियन्सनं ( MI) आज आयपीएल इतिहासातील आणखी एक दमदार विजय मिळवला. ज्या संघानं चेन्नई सुपर किंग्ससारख्या बलाढ्य संघाला १९० धावांचे लक्ष्य सहज पार केले त्या राजस्थान रॉयल्सला मुंबईनं ९० धावांवर रोखले. त्यानंतर इशान किशनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईनं ८.२ षटकांत हा सामना जिंकला.

जिमी निशॅम ( ३-१२) व नॅथन कोल्टर-नायल ( ४-१४) यांनी मिळून सात विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्याही नावावर २ विकेट्स राहिल्या. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनी हात धुवून घेतले. त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना मुंबई इंडियन्सला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईनं गुणतक्त्यात पाचव्या स्थानी झेप घेतली.

मुंबईला नेट रन रेट सुधारण्यासाठी हा सामना ९ किंवा त्यापेक्षा कमी षटकांत जिंकण्याचे आव्हान होते. रोहित शर्मा व इशान किशन या नव्या जोडीनं तशी आक्रमक सुरुवातही केली. रोहितला एकदा जीवदान मिळाले, परंतु चेतन सकारियानं त्याला २२ धावांवर बाद केले. सूर्यकुमार यादव झटपट १३ धावा करून बाद झाला. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ५६ धावा केल्या.

पण, इशान किशन आज सुसाट होता, त्यानं चेतन सकारियानं टाकलेल्या ८व्या षटकात २४ धावा कुटल्या. मुंबईनं ८.२ षटकांत २ बाद ९४ धावा करून हा सामना जिंकला. इशान किशननं २५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या.

रोहित शर्मानं आजच्या सामन्यात २ षटकार खेचून मोठा विक्रम केला. ट्वेंटी-२०त ४०० षटकार मारणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. ( Rohit Sharma in this match becomes the first Indian to reach 400 sixes in T20 cricket.) या यादीत ख्रिस गेल १०४२ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये १० षटकाच्या आत दोन विजय मिळवणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरला. यापूर्वी २००८मध्ये त्यांनी कोलकाताविरुद्ध ५.३ षटकांत ६८ धावांचे लक्ष्य पार केले.

आता मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १०० धावा किंवा ८-९ षटकांत विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतर त्यांचा नेट रन रेट कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा अधिक होईल. पण, KKRनं राजस्थान रॉयल्सला मोठ्या फरकानं नमवल्यास MIचा मार्ग अवघड होईल. मात्र, MI vs SRH हा सामना सर्वात शेवटी होणार आहे. त्यामुळे काही होऊ शकते.