IPL 2021, Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानं मुंबई इंडियन्सला बसलाय मोठा धक्का; गतविजेत्यांच्या मार्गात अडथळा

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकातानं १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेतील चौथे स्थान आणखी मजबूत केलं. SRHला ८ बाद ११५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडल्यानंतर KKRनं शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर हा सामना जिंकला. KKRच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

IPL 2021मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) प्ले ऑफचं पहिलं तिकिट पटकावलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSKनं १२ सामन्यांत ९ विजयासह १८ गुण कमावले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स ( DC) व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) यांनीही प्रत्येकी १२ सामन्यांत अनुक्रमे १८ व १६ गुणांसह प्ले ऑफमधील जागा पक्की केली.

आता चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता नाइट रायडर्ससह मुंबई इंडियन्स ( MI), पंजाब किंग्स ( PBKS), राजस्थान रॉयल्स ( RR) हेही संघ शर्यतीत आहेत. KKR या सर्वांत उजवा ठरतोय कारण त्यांचे गुण व नेट रन रेट अन्य तिघांपेक्षा सरस आहे. KKR १३ सामन्यांनंतर १२ गुण व +०.२९४ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.

पंजाब किंग्स १३ सामन्यांनंतर १० गुण व -०.२४१ नेट रन रेटसह पाचव्या, राजस्थान रॉयल्स १२ सामन्यांनंतर १० गुण व -०.३३७ नेट रन रेटसह सहाव्या आणि मुंबई इंडियन्स १२ सामन्यांनंतर १० गुण व -०.४५३ नेट रन रेटसह सातव्या क्रमांकावर आहेत.

कोलकातानं अखेरच्या साखळी सामन्यात RRला पराभूत केल्यास त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित आहे, कारण त्यांचा नेट रन रेट अन्य संघांपेक्षा चांगला आहे.

मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना उर्वरित सामन्यात RR व SRH यांना तर नमवावे लागेल, शिवाय RRकडून KKRचा पराभव होण्यासाठी प्रार्थना करावी लागेल.

राजस्थाननं त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. पंजाबनं चेन्नईला पराभूत केले तरी त्यांचे १२ गुण होतील आणि त्यांचा नेट रन रेटही तितका चांगला नाही.

Read in English