IPL 2021, SRH vs CSK Live Updates : ऋतुराज गायकवाड सॉलिड खेळला; रोहित शर्मा, गौतम गंभीर यांचा मोठा विक्रम मोडला

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) च्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाला माफक धावसंख्येवर रोखले. वृद्धीमान सहानं चांगला खेळ केला, परंतु CSKच्या गोलंदाजांसमोर अन्य फलंदाजांचे काहीच चालले नाही.

त्यानंतर चेन्नईच्या सलामीवीरांनीच हैदराबादला सडेतोड उत्तर दिले. ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या जोडीनं सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी भागीदारी केली. ऋतुराजनं तर आणखी एक सातत्यपूर्ण कामगिरी करताना रोहित शर्मा व गौतम गंभीर यांचा मोठा विक्रम मोडला.

चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेसन रॉयनं ( २) पहिल्याच सामन्यात धडाकेबाज खेळी केली. पण, आज CSKविरुद्ध तो अपयशी ठरला. केन विलियम्सन व वृद्धीमान सहा यांनी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्राव्होनं त्याच्या पहिल्याच षटकात विलियम्सनला ( ११) पायचीत पकडले.

ब्राव्होनं आणखी एक विकेट घेत प्रियाम गर्गला ( ७) बाद केले. रवींद्र जडेजाच्या फिरकीवर सहानं मारलेला फटका चूकला अन् धोनीनं तो अलगद झेलला. सहानं १ चौकार व २ षटकार खेचून ४४ धावा केल्या. जोश हेझलवूडनं एकाच षटकात दोन धक्के देत CSKची बाजू भक्कम केली. त्यामुळे SRH ची गाडी घसरली. त्यांना जेमतेम ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले.

माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात CSKच्या सलामीवीरांनी सावध खेळ करण्यावरच धन्यता मानली. फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पॉवर प्लेमध्ये ४७ धावा जोडल्या. या दोघांनी पुढे असाच खेळताना आयपीएल २०२१त सहाव्यांदा अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी चांगली खेळली.

राशिद खानच्या जादूई फिरकीलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ऋतुराजनं सातत्यपूर्ण कामगिरी करताना अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल केली होती, परंतु ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन होल्डरनं त्याला बाद केलं. ऋतुराजनं पुढे येऊन चेंडू टोलावला आणि केन विलियम्सननं मिड ऑफला सहज झेल टिपला. ऋतुराजनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४५ धावा केल्या.

आयपीएलमध्ये १७ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत ऋतुराजनं अव्वल स्थान पटकावलं. ( Most IPL runs by Indian players after 17 Innings) त्यानं ६११ धावा केल्या आहेत आणि गौतम गंभीर ( ५६५) व रोहित शर्मा ( ५३०) यांना त्यांनी मागे टाकले. मॅथ्यू हेडननं १७ डावांत ७७८ धावा केल्या होत्या, त्यानंतर शॉन मार्श ( ७७६), लेंडल सिमन्स ( ७३९), जॉनी बेअरस्टो ( ७०२), मायकेल हस्सी ( ६३०) आणि ऋतुराज असा क्रमांक येतो.