Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : मुंबई इंडियन्सचा 'करेक्ट कार्यक्रम'; मोक्याच्या क्षणी उघडले पत्ते; संघात घेतले हुकमी एक्के!

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians) सर्वात यशस्वी का आहे, याची प्रचिती IPL २०२२ ऑक्शनमध्ये आली.

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians) सर्वात यशस्वी का आहे, याची प्रचिती IPL २०२२ ऑक्शनमध्ये आली. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी केवळ इशान किशन व डेवॉल्ड ब्रेव्हिस असे दोनच खेळाडू खरेदी करून बटव्यातल्या ४८ कोटींपैकी केवळ १८.२५ कोटी मुंबईने खर्च केले होते. त्यांनी खूप प्लान करून प्रत्येक खेळाडूसाठी पैसे राखून ठेवले.

पहिल्या दिवशी इशानचं नाव येताच मुंबईने वाटेत ती किंमत मोजली आणि आज जोफ्रा आर्चरसाठी ८ कोटी ओतले. त्यात त्यांनी टीम डेव्हिडलाही घेत हार्दिक पांड्याची उणीव भरून काढली आहे. आज लिलावाची सुरुवात झाली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या खात्यात २७. ८५ कोटी रुपये होते आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांनी त्यातील २३ कोटी राखून ठेवले होते.

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज व राजस्थान रॉयल्सचा माजी जोफ्रा आर्चर याचे नाव येतात मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपये मोजले. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडील पैसे हे फार कमी होते आणि SRH ला माघार घ्यावी लागली. जोफ्रा आर्चर यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्ससाठी दुखापतीमुळे उपलब्ध होणार नसला तरी मुंबई इंडियन्सने भविष्याचा विचार करून हा निर्णय घेता.

आकाश अंबानी म्हणाले, खेळाडू रिटेन करण्याची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वीच्या रात्री झोप लागली नाही. इशान किशानला आम्हाला जाऊ द्यावे लागले, परंतु ऑक्शनमध्ये त्याला घेणार हे आधीच ठरवले होते. जोफ्रा आर्चरसाठीही आम्ही आधीच विचार केला होता. या वेळेस तो खेळणार नसला तरी जोफ्रा व जसप्रीत बुमराह ही जोडी पुढच्या आयपीएलमध्ये सज्ज असेल..

आयपीएलच्या या पर्वात जोफ्रा खेळणार नसला तरी मुंबई इंडियन्सने टायमल मिल्सला ताफ्यात घेत यंदाच्या पर्वातील टेंशन दूर केले आहे. इंग्लंडचाच मिल्स डेथ ओव्हरसाठी उपयुक्त गोलंदाज आहे आणि त्यानं १५६ ट्वेंटी-२० त १७६ विकेट्स नावावर केल्या आहेत. जयदेव उनाडकट याचीही निवड करून संघात एक डावखुरा जलदगती गोलंदाज घेतला आहे. उनाडकटच्या नावावर आयपीएलच्या ८६ सामन्यांत ८५ विकेट्स आहेत.

हार्दिक पांड्याची उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी संघात टीम डेव्हिड याला घेतले. सिंगापूरच्या या खेळाडूला RCBने मागच्या वर्षी एकाच सामन्यात खेळवले होते. त्याने आताच पाकिस्तान सुपर लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. टीम डेव्हिड असे या फलंदाजाचे नाव आहे आणि त्याने PSL मध्ये 28*(16), 71(29), 51*(19) आणि 34(18) अशी फटकेबाजी केली आहे.

डेवॉल्ड ब्रेव्हिसला ताफ्यात घेत किरॉन पोलार्डसोबत एक खमका फिनिशर मुंबई इंडियन्सने मिळवला. एबी डिव्हिलियर्सचा ( AB de Villiers) जबरा फॅन असलेला आणि त्याच्याचसारखी ३६० डिग्री फलंदाजी करणाऱ्या ब्रेव्हिसला त्याचे मित्र व सहकारी Baby AB नावाने बोलवतात... १८ वर्षीय ब्रेव्हिसने वेस्ट इंडिज येथे झालेल्या Under-19 World Cup स्पर्धेत त्याने ६ सामन्यात सर्वाधिक ५०६ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित शर्मा व इशान किशन सलामीला खेळल्यानंतर सूर्यकुमार यादव व टीम डेव्हिड हे मधली फळी सांभाळायला आहेत आणि त्यानंतर किरॉन पोलार्ड व डेवॉल्ड ब्रेव्हिस हे स्फोटक फलंदाज आहे. अशात मुंबई इंडियन्सला डॅनिएल सॅम्स किंवा टायमल मिल्स यांच्यापैकी एकालाच खेळवता येईल. जसप्रीत बुमराह, जयदेव, मुरुगन अश्विन अशी फळी आहेच नंतर.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख)