हार्दिकच्या संघाला अमन खान भिडला; दुर्घटनेमुळे गोलंदाजाचा झालेला फलंदाज चमकला

IPL 2023, GT vs DC Live Marathi : अमन खानच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ५ बाद २३ धावांवरून ८ बाद १३० धावांपर्यंत मजल मारली. अमन शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने ४४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. त्याने गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीच्या मेहनतीवर पाणी फिरवले.

२६ वर्षी अमन खान हा मोठे फटके मारणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तो मध्यमगती गोलंदाजीही करतो. कोलकाता नाइट रायडर्सने त्याला २० लाखांच्या मुळ किमतीत संघात घेतले होते, परंतु यंदा तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय.

वडिलांना क्रिकेट खेळताना पाहत पाहत मुंबईत वाढलेल्या अमनने क्रिकेटपटू बनण्याचा निर्णय घेतला. त्याने श्रेयस अय्यरसोबत अनेक वयोगटातील स्पर्धांमध्ये सहाभाग घेतला.

अमनने जलदगती गोलंदाज बनावे अशी वडीलांची इच्छा होता, परंतु त्याला फलंदाजीची फार कमीच संधी मिळायची. एका रस्ता अपघाताने त्याचे नशीब पालटले. अपघातात त्याच्या टाचेला दुखापत झाली, तरीही तो पुढच्या सामन्यात १४ वर्षांखालील स्पर्देत खेळला अन् ६० धावा चोपल्या. प्रशिक्षण प्रविण आम्रे यांचे लक्ष वेधण्यासाठी ही खेळी पुरेशी ठरली अन् नंतर तो संघाचा ओपनर बनला.

मुंबईच्या १९ वर्षांखालील संघातील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची कूच बेहार ट्रॉफीसाठी निवड झाली. परंतु दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. २०२०-२१च्या विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले. सौराष्ट्रविरुद्धच्या त्या मॅचमध्ये त्याला संधी मिळाली नाही, परंतु कर्नाटकविरुद्ध उपांत्य फेरीत त्याने सहाव्या क्रमांकावर येताना १८ चेंडूंत २५ धावा केल्या.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने १४८.१४च्या स्ट्राईक रेटने ४० धावा केल्या. आयपीएलच्या निवड चाचणीत त्याने ४७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. त्याने अय्यरसोबत १२७ धावांची भागीदारीही केली.