वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं! आता वर्ल्ड कप विजेता कर्णधार दिल्लीला मिळवून देणार का 'यश'? जाणून घ्या त्याचा संघर्ष

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२३ मधील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून यश धुलने ( Yash Dhull) आज पदार्पण केले. भारताना त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून दिला आणि त्यात त्याने अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले.

आज तो दिल्ली कॅपिटल्सला IPL 2023 मधील पहिला विजय मिळवून देईल का, याची सर्वांना उत्सुकता आहे. भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघापासून ते दिल्ली कॅपिटल्स पर्यंतचा यशचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

यश धुल आणि त्याच्या कुटंबीयांनी काही महिन्यांपूर्वी मुलाखत दिली होती. यावेळी यशनं आपला इथवरचा प्रवास उलगडला. त्याच्या वडीलांचेही क्रिकेटर बनण्याचे स्वप्न होते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना क्रिकेट सोडून जॉब करावा लागला. त्यांचं स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं आणि माझी प्रॅक्टिस प्रभावित होऊ नये, यासाठी त्यांनी आपला जॉबही बदलला, असे यशने सांगितले.

"माझे वडील कॉस्मेटिकच्या कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्यांना अनेकदा प्रवास करावा लागत होता. म्हणूनच त्यांना प्रॅक्टिसवरही लक्ष देता येत नव्हतं, म्हणून त्यांनी आपली नोकरीही बदलली. त्यानंतर आमच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली होती," असं यश म्हणाला.

वडिलांनी नोकरी बदलल्यानंतर अनेक खर्चात कपात केली. परंतु यश आणि त्याच्या बहिणीवर कोणताही प्रभाव पडू दिला नाही. त्या दरम्यान यशच्या आजोबांच्या पेन्शनच्या मदतीनं संपूर्ण घराचा खर्च चालत होता. ते लष्करातून निवृत्त झाले होते.

"ज्यावेळी माझे वडील कामावर जायचे तेव्हा माझं ट्रेनिंग आणि मॅचसाठी आजोबा मला घेऊन जायचे. ६ वर्षांचा असतानाच ते मला बाल भवन आणि एअर लाइनर क्रिकेट अॅकेडमीममध्ये घेऊन जात होते. जोवर ट्रेनिंग सुरू असायचं तोवर ते मैदानाबाहेर बसून राहायचे, असं यशनं सांगितलं.

अनेकदा मॅचला ते घेऊनही जात असत. काही वेळा माझी कामगिरी चांगली झाली नाही, तरीही ते माझं मनोबल वाढवत होते," असं म्हणत त्यानं आपल्या आजोबांची आठवण सांगितली.

मी अन्य मुलांप्रमाणेच क्रिकेट खेळत होतो. कायम बॅट आणि बॉल सोबत असायचा. त्यावेळी माझ्या आईनं माझी आवड पाहून वडिलांना अॅकेडमीममध्ये दाखल करण्यास सांगितलं. क्रिकेटमध्ये असलेली माझी आवड पाहून घराच्या गच्चीवर मझी प्रॅक्टिस घेत होते, असंही यशनं सांगितलं.

आपल्याला मीडियम पेसर गोलंदाज बनायचं होतं, आपण गोलंदाजीही करत होते. परंतु एअर लायनर अॅकेडमीचे कोच प्रदीप कोचर यांनी आपल्याला फलंदाज बनवलं. त्यांनी मला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच फलंदाजीच्या जोरावर मी मी अंडर १९ चा टीम इंडियाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचू शकलो, असंही त्यांनं नमूद केलं.