IPL 2023 Mini Auction, CSK: MS Dhoni ने दिली नाही पुरेशी संधी, पण आता पठ्ठ्याने ठोकलं द्विशतक, मारले ३४ चौकार

धोनीचा CSK संघ समतोल मानला जातो पण तरीही...

IPL 2023 Mini Auction, CSK: इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनआधी संघांनी अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. MS Dhoni च्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघात आपल्या ८ खेळाडूंना Release केले.

आता २३ डिसेंबरला, शुक्रवारी नव्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी बोली लावली जाणार आहे. या लिलावाच्या अगदी तोंडावर एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. CSKच्या संघातून फारशी संधी देण्यात न आलेल्या एका खेळाडूने आपल्या दमदार फलंदाजीची चुणूक दाखवून दिली आहे.

धोनीचा चेन्नई संघ हा सर्वात समतोल संघ मानला जातो. संपूर्ण हंगामात पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत संघात फार बदल न करणारा संघ म्हणून CSKची ओळख आहे. पण त्यामुळेच एका खेळाडूला धोनीच्या संघाकडून खूप कमी संधी मिळाली पण त्याने दुसऱ्या व्यासपीठावर मिळालेल्या संधीचे सोने केले.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूचा संघात समावेश केल्यावर ध्रुव शौरे प्रसिद्धीच्या झोतात आला. पण त्याला फक्त २ सामनेच मिळाले. २०१८ च्या हंगामात त्याने एक सामना खेळला होता, तर २०१९ मध्ये या खेळाडूने दुसरा सामना खेळला होता. त्यानंतर, आयपीएलमध्ये कोणत्याच संघाने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही.

पण, रणजी ट्रॉफीमध्ये भारताच्या देशांतर्गत फलंदाजांची दमदार कामगिरी कायम आहे. आसामविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर ध्रुव शौरेने शानदार द्विशतक ठोकले. दिल्लीने पहिल्या डावात ४३९ धावा केल्या आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे याच एकट्या ध्रुव शौरेने यात २५२ धावा कुटल्या.

ध्रुव शौरेची ही खेळी अप्रतिम होती कारण हा खेळाडू शेवटपर्यंत बाद झाला नाही. शेवटपर्यंत नाबाद राहून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा तिसरा फलंदाज ठरण्याचा पराक्रम केला. ध्रुव शौरेने ३१५ चेंडूंच्या खेळीत ३४ चौकार आणि २ षटकार ठोकले. दिल्लीच्या या फलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. यापूर्वी त्याची सर्वोत्तम खेळी १४५ धावा होती.