IPL 2023 New Rules : इम्पॅक्ट प्लेअर ते Wide-No Ball साठी DRS; ५ नवे नियम वाढवतील आयपीएलची रोमहर्षकता

इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) जुन्या फॉरमॅटमध्ये, परंतु ५ नव्या नियमांसह खेळवली जाणार आहे. ३१ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला होणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) जुन्या फॉरमॅटमध्ये, परंतु ५ नव्या नियमांसह खेळवली जाणार आहे. ३१ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होईल तेव्हा तीन वर्षांनंतर आयपीएल पुन्हा एकदा होम-अवे फॉर्मेटमध्ये परत येईल. आयपीएलच्या १६व्या पर्वात काही नवीन नियम पाहायला मिळणार आहेत आणि त्यामु स्पर्धेतील रस वाढू शकतो.

प्लेइंग इलेव्हनची घोषणा - या आयपीएलमध्ये टॉसनंतर प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली जाईल. आता नाणेफेकीच्या निकालानुसार संघ आपली प्लेइंग इलेव्हन निवडू शकतात. आयपीएल ही दुसरी ट्वेंटी-२० लीग आहे ज्यामध्ये हे होणार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये असे घडले होते.

दोन प्लेइंग इलेव्हनची टीम शीट - टॉसच्या वेळी कॅप्टनकडे प्लेइंग इलेव्हनची दोन टीम शीट असेल. कर्णधार नाणेफेकीच्या निकालानुसार प्लेइंग इलेव्हन निवडून संघ पत्रकाची देवाणघेवाण करेल. यामध्ये प्लेइंग इलेव्हनच्या ११ खेळाडूंसह पाच पर्यायी खेळाडूंचीही नावे असतील. हेच पर्यायी खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकतात.

इम्पॅक्ट प्लेयरचे पदार्पण - या आयपीएलमध्ये प्रथमच इम्पॅक्ट प्लेअरचा वापर पाहायला मिळणार आहे. यामध्ये कर्णधार खेळादरम्यान त्याच्या सोयीनुसार प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडू बदलू शकतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागी येणार्‍या नवीन खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हटले जाईल.

एक संघ एका सामन्यात फक्त एकदाच इम्पॅक्ट प्लेअर वापरू शकतो. ज्या पाच पर्यायी खेळाडूंची नावे कर्णधाराने नाणेफेकीच्या वेळी विरोधी कर्णधाराला दिली होती, त्यातूनच प्रभावशाली खेळाडू निवडला जाऊ शकतो. भारतीय किंवा परदेशी कोणताही खेळाडू प्रभावशाली खेळाडू बनू शकतो. तथापि, प्लेइंग इलेव्हनमध्ये आधीच चार नावे असल्यास, प्रभावशाली खेळाडू म्हणून केवळ एक भारतीय चेहरा येऊ शकतो.

फलंदाजी करताना इम्पॅक्ट प्लेअरचा वापर - फलंदाजी करणाऱ्या संघाने प्रभावशाली खेळाडू घेतल्यास तो प्लेइंग इलेव्हनमध्ये तोपर्यंत फलंदाजी न केलेल्या कोणत्याही खेळाडूची जागा घेईल. याचा अर्थ जास्तीत जास्त ११ खेळाडूच फलंदाजी करू शकतात. १२ खेळाडू फलंदाजीसाठी उतरतील असे होणार नाही.

गोलंदाजी करताना प्रभावशाली खेळाडूचा वापर - गोलंदाजी संघ षटकांचा कोटा संपल्यानंतर आपल्या कोणत्याही खेळाडूच्या जागी प्रभावशाली खेळाडू घेऊ शकतो. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअरही गोलंदाजी करू शकतो. येथेही तीच अट राहील की जास्तीत जास्त ११ खेळाडूच गोलंदाजी करू शकतील.

वाईड-नो बॉलवर DRS - आयपीएल 2023 दरम्यान संघ वाईड आणि नो बॉलवर डीआरएस घेऊ शकतात. आतापर्यंत हे केवळ देण्याच्या निर्णयावरच होऊ शकत होते. अलीकडेच डब्ल्यूपीएलमध्ये वाईड-नो बॉलवर डीआरएस सादर करण्यात आला आणि तो आयपीएलमध्ये आणला गेला.

स्लो ओव्हर रेटवर शिक्षा- गोलंदाजी करताना संघांचा ओव्हर रेट निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असल्यास, कमी केल्या जाणाऱ्या षटकांमध्ये पाचऐवजी फक्त चार क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर राहू शकतात. उदाहरणार्थ, जर ओव्हर रेटनुसार १८ ओव्हर्स असतील पण फक्त १७ शक्य असतील तर शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये तो टीम 30 यार्डच्या बाहेर फक्त चार फील्डर ठेवू शकेल.

क्षेत्ररक्षक-किपरच्या त्रुटीवर दंड - गोलंदाजीदरम्यान क्षेत्ररक्षक किंवा यष्टीरक्षकाने बेकायदेशीर हालचाली केल्यास त्याच्या संघाला पाच धावांचा दंड आकारला जाईल. तसेच चेंडूला डेड बॉल म्हटले जाईल.