IPL 2023 PlayOffs Scenario : दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमधून बाद? मुंबई इंडियन्सचं भवितव्य उद्या ठरणार; पाहा Point Table

IPL 2023 PlayOffs Scenario : रिषभ पंतच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला इंडियन सुपर लीग २०२३ मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली अपयश आलेले दिसत होते. दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना नाट्यमयरित्या जिंकला. त्यांचा हा ७ सामन्यांमधील दुसरा विजय ठरला, तरीही ते प्ले ऑफच्या शर्यतीतीत त्यांचे गणित अवघड झाले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. पण, तरीही दिल्लीची गाडी ही १०व्या क्रमांकावरच अडकलेली दिसतेय. त्यांनी ७ पैकी २ सामने जिंकता आले आहेत आणि इथून पुढे त्यांना उर्वरित ७ सामने जिंकावे लागतील व अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. दिल्लीचे ४ गुण झाले असले तरी ते -०.९६च्या रनरेटमुळे दहाव्या क्रमांकावर आहेत.

IPL 2023 चे प्लेऑफच्या सामने २३ आणि २९ मे दरम्यान खेळवले जातील. चेन्नई आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी २-२ सामने होणार आहेत. क्वालिफायर एकचा सामना २३ मे रोजी चिदंबरम स्टेडियम,चेन्नई येथे होईल आणि त्यानंतर २४ मे रोजी एलिमिनेटरचा सामना याच मैदानावर पार पडेल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये २६ व २८ मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर २ आणि फायनल होणार आहे.

IPL 2023 Point Table पाहिल्यास चेन्नई सुपर किंग्सचा संघ १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने ७ पैकी ५ सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर राजस्थान रॉयल्स ( ४ विजय व ३ पराभव), लखनौ सुपर जायंट्स ( ४ विजय व ३ पराभव), गुजरात टायटन्स ( ( ४ विजय व २ पराभव) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ४ विजय व ३ पराभव) हे प्रत्येकी ८ गुणआंसह मागे आहेत.

पंजाब किंग्सनेही ४ विजय व ३ पराभव असे निकाल नोंदवताना ८ गुणांसह सहावे स्थान पटकावले आहे. मुंबई इंडियन्स ६ सामन्यांत प्रत्येकी ३-३ जय-पराभव नोंदवून ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादला सोमवारी पराभव पत्करावा लागला असता तरी, ७ पैकी २ सामने जिंकून -०.७२च्या नेट रन रेटमुळे ते नवव्या क्रमांकावर आहेत.

कोलकाता नाइट रायडर्सला ७ पैकी २ सामने जिंकता आलेले आहेत आणि ४ गुणांसह ते आठव्या क्रमांकावर आहेत. मुंबई आणि गुजरात वगळल्यास आतापर्यंत सर्व संघांचे प्रत्येकी ७ सामने झाले आहेत. आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.

मुंबईने हा सामना जिंकला, तर ते ८ गुणांसह आगेकूड करतील. पण, या सामन्यात हार झाली तर त्यांची पुढील वाटचाल बिकट होणार आहे.