Yudhvir Singh: पाच बहिणींचा लाडका! वडिलांचा विरोध डावलून झाला क्रिकेटर, जम्मूतून आला आणखी एक वेगाचा 'बादशाह'!

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगने भारताला अनेक वेगवान गोलंदाज दिले. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, आवेश खान, टी नटराजन, उम्रान मलिक... आदी काही ताजी नावं आहेत.. यात आता आणखी एक नाव समाविष्ठ झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

पंजाब किंग्सविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने युधवीर सिंग ( Yudhavi Singh) या गोलंदाजाला पदार्पणाची संधी दिली आणि त्याने त्याच्या पहिल्या दोन षटकांतच वेगवान मारा करताना फलंदादांना चाचपडण्यास भाग पाडले. प्रभसिमरन सिंगचा त्याने उडवलेला त्रिफळा पाहण्यासारखा होता. चेंडूचा वेगच एवढा होता की स्टम्प्सने दोन-तीन वेळा बाऊन्स झाला...

युधवीर सिंग चरकचा जन्म १३ सप्टेंबर १९९७ रोजी जम्मू येथील रूपनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याचे वेड होते. वडील धरमवीर सिंह चरक यांना आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्याची इच्छा होती. पण युधवीरने क्रिकेटमध्येच आपलं करिअर घडवण्याचं स्वप्न पाहण्यास सुरुवात केली.

पालक सहमत नव्हते. युधवीर हा त्याच्या पाच बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ आहे. तो त्याच्या बहिणींचा लाडका आहे. त्याने युधवीरला खूप साथ दिली. बहिणींनी वडिलांना समजावले. यानंतर संपूर्ण कुटुंब युधवीरच्या स्वप्नांसोबत जगू लागले. युधवीरच्या बहिणीने सांगितले की, आम्हा पाच बहिणींचा एकच भाऊ आहे. सर्व बहिणींनी मिळून आपल्या आई-वडिलांना भावाला आधार देण्यासाठी तयार केले.

त्यानंतर युधवीर क्रिकेट अकादमीत दाखल झाला. प्रशिक्षणादरम्यान क्रिकेटमधील बारकावे शिकले. त्याने मेहनत घेतली. तासनतास उन्हात घाम गाळला. त्यानंतर युधवीर उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला. यासोबतच गरज पडेल तेव्हा फलंदाजी करण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे.

युधवीर चरक १४० च्या वेगाने गोलंदाजी करतो. युधवीरचा वेग ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्याने जम्मूसाठी देशांतर्गत सामने सुरू केले. युधवीर हैदराबादला गेला आणि त्याच्या करिअरला योग्य दिशा मिळाली. हैदराबादच्या २३ वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर हैदराबाद संघाची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड झाली.

युधवीरने १२ नोव्हेंबर २०१९ रोजी चंदीगड विरुद्ध पदार्पण ट्वेंटी-२० सामना खेळला. त्या सामन्यात त्याने २ विकेट घेतल्या होत्या. ज्यामध्ये सलामीवीर फलंदाज मनन व्होराच्या विकेटचाही समावेश आहे.

त्यानंतर पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात पदार्पण केले. त्याने १७ डिसेंबर २०१९ रोजी पंजाबविरुद्ध पदार्पण केले. युधवीर देशांतर्गत सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी करत होता. युधवीर चरकने आपल्या वेगवान गोलंदाजीने क्रिकेटच्या दिग्गजांना प्रभावित केले.

आयपीएल फ्रँचायझींचीही त्याच्यावर नजर होती. आयपीएल २०२१च्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत ताफ्यात घेतले. या निवडीनंतर तो रडला होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आज त्याने लखनौ सुपर जायंट्सकडून पदार्पण करताना सामना गाजवला.