आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये दरवर्षी नवनवे रेकॉर्ड होत असतात. तर जुने रेकॉर्ड्स तुटत असतात. मात्र टी-२० हा फलंदाजांचा खेळ असल्याने आणि आयपीएलमधील खेळपट्ट्या ह्या फलंदाजांना अनुकूल असलेल्याने इथे गोलंदाजांची धुलाई होत असते. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज तुम्हाला माहिती असतीलच. मात्र आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज तुम्हाला माहिती आहेत का? या गोलंदाजांची यादी पुढीलप्रमाणे आहे. .
आयपीएलमधून निवृत्त झालेल्या हरभजन सिंगचं नाव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये १४५ षटकार ठोकले गेले आहेत. मात्र भज्जीने आयपीएलमधील १६३ सामन्यांमध्ये आतापर्यंत १५० विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.
या यादीत चौथ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आहे. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी आतापर्यंत १४६ षटकार ठोकले आहेत. मात्र त्याने आयपीएलमधील १३१ सामन्यांमध्ये १६६ विकेट्स टिपले आहेत.
या यादीमध्ये ज्या गोलंदाजाचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. हे नाव आहे रवींद्र जडेजाचं. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १५६ षटकार ठोकले गेले आहेत. जडेजाने आपल्या आयपीएलमधील २१० सामन्यांमध्ये १३२ विकेट्स काढल्या आहेत.
या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत एकूण १७५ षटकार ठोकले गेले आहेत. अमित मिश्रासुद्धा आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे. त्याने १५४ सामन्यांमध्ये एकूण १६६ विकेट्स टिपले आहेत. त्याची सरासरी २३ एवढी आहे.
पीयूष चावला हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत आयपीएलमध्ये १८१ षटकार ठोकले गेले आहेत. पीयूष चावला आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळलाय. त्याने १६५ सामन्यांमध्ये आतापर्यंत १५७ विकेट्स टिपले आहे.