IPL 2024: CSK त ऋतु'राज'! कर्णधार म्हणून धोनीचा दबदबा; माहीच्या रेकॉर्डला तोडच नाही

Ruturaj Gaikwad: आयपीएल २०२४ च्या सलामीच्या सामन्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले आहे.

चेन्नईच्या संघाची धुरा आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यामुळे तो लवकरच आयपीएलमधून देखील निवृत्त होण्याची शक्यता आहे.

खरं तर मागील वर्षीच धोनी निवृत्त होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र, आयपीएलच्या सोळाव्या हंगामात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गतविजेत्या गुजरात टायटन्सला नमवून किताब जिंकण्याची किमया साधली.

धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाचवेळा ट्रॉफी जिंकली. याशिवाय सर्वाधिकवेळा अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणूनही चेन्नईच्या संघाची ख्याती आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा किताब जिंकवून दिला. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक १३३ सामने जिंकले आहेत. तर आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माची ओळख आहे.

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ८७ सामने जिंकले. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने ७१ आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६६ सामने जिंकले.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत गंभीर आणि कोहली अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. किंग कोहलीने या आधीच कर्णधारपद सोडले आहे. तर गंभीर निवृत्तही झाला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे महेंद्रसिंग धोनीनेच ऋतुराज गायकवाडवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. चेन्नईच्या फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.

कोणतीही पूर्वकल्पना नसताना धोनीने नेहमीप्रमाणे अचानक मोठा निर्णय जाहीर केला. खरं तर धोनी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता तेव्हा देखील याच पद्धतीने अचानक निर्णय घेऊन माहीने चाहत्यांना धक्का दिला होता.