Inside Story! हार्दिक पांड्या अजूनही मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, १६ दिवसांत सूत्र हलणार

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात कायम राखलेल्या व करारमुक्त खेळाडूंच्या नावांची यादी आज सर्व १० फ्रँचायझींनी जाहीर केली. आयपीएल २०२४ची रिटेन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख होती.

आज यादी जाहीर होईपर्यंत हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या संघात पुनरागमन करेल अशी जोरदार चर्चा रंगली होती. पण, गुजरात टायटन्सने त्यांची रिटेन लिस्ट जाहीर केली आणि त्यात हार्दिकचे नाव पाहून सर्वांना खास करून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

२०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पांड्या हा मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू होता, परंतु २०२२ मध्ये त्याने गुजरात टायटन्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याने कॅप्टन्सीच्या पहिल्याच पर्वात गुजरात टायटन्सला जेतेपद पटकावून दिले. २०२३ मध्ये त्याने संघाला पुन्हा फायनलपर्यंत पोहोचवले होते, परंतु चेन्नई सुपर किंग्सने त्यांना पराभूत केले.

हार्दिकच्या घरवापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. पण, हार्दिक अजूनही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अजूनही दाखल होऊ शकतो. आज रिटेशन लिस्ट जाहीर झाली असली तरी ट्रेडिंग विंडो १२ डिसेंबरपर्यंत सुरू आहे आणि १६ दिवसात सूत्र फिरली तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये १५.२५ कोटी रुपये आहेत आणि १९ डिसेंबरला होणाऱ्या आयपीएल ऑक्शनमध्ये ते आणखी खेळाडू ताफ्यात घेऊ शकतात. हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून १५ कोटी रुपये मिळतात. त्यामुळे मुंबई इंडियन्स अजूनही त्याला आपल्या ताफ्यात घेऊ शकतात.

हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत.

गुजरात टायटन्सने कायम राखलेले खेळाडू -डेव्हडि मिलर, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, हार्दिक पांड्या ( कर्णधार), अभिमन मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशीद खान, जोशूआ लिटल, मोहित शर्मा