IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल

IPL 2025 Retentions, Massive Salary Hikes: एका वर्षात एवढं इन्क्रीमेंट... पाहा कोणाला किती टक्के मानधन वाढ

आगामी IPL 2025 साठी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांना दिलेले मानधन जाहीर केले. त्यात ७ युवा खेळाडू तुफान मालामाल झाले.

यादीत सर्वात मोठी झेप ध्रुव जुरेलने घेतली. राजस्थान रॉयल्सने त्याला गेल्या वर्षी २० लाखात खरेदी केले होते. यंदा त्याला तब्बल १४ कोटींना रिटेन करण्यात आले. त्याचे मानधन चक्क ६९०० % वाढले.

यादीत दुसरा नंबर श्रीलंकेच्या मथिशा पाथिराना याने लावला. चेन्नई सुपर किंग्जने त्याला गेल्या वर्षी २० लाखात खरेदी केले होते. यंदा त्याला तब्बल १३ कोटींना रिटेन करण्यात आले. त्याचे मानधन ६४०० % वाढले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने रजत पाटीदारला ११ कोटींच्या किमतीसह संघात कायम ठेवले. गेल्या वर्षी त्याला केवळ २० लाखांच्या बोलीवर संघात घेण्यात आले होते. त्याचे मानधन ५४०० % वाढले.

मयंक यादव साठीही लखनौ सुपर जायंट्स संघाने मोठी रक्कम मोजली. गेल्या वर्षी केवळ २० लाखांमध्ये मिळालेला मयंक यंदा तब्बल ११ कोटींचा धनी ठरला. त्याचेही मानधन ५४०० % वाढले.

गुजरात टायटन्स संघाने युवा साई सुदर्शनला गेल्या वर्षी २० लाखांना खरेदी केले होते. यंदा मात्र त्याला ८.५० कोटी मानधन मिळाले आणि तब्बल ४१५० टक्क्यांची वाढ मिळाली.

पंजाब किंग्ज संघाला शशांक सिंग गेल्या वर्षी केवळ २० लाख रुपयांत मिळाला होता. पण यावेळी त्याला ५.५० कोटी देण्यात आले आहेत. त्याचे मानधन २६५० टक्के वाढले.

टीम इंडियात आपली चमक दाखवणाऱ्या रिंकू सिंगसाठी कोलकाता नाइट रायडर्स उदार झाली. गेल्या वर्षी केवळ ५५ लाखांत मिळालेला रिंकू यंदा तब्बल १३ कोटी घेऊन गेला. त्याचे मानधनही २२६४% वाढले.