यंदाच्या आयपीएलमध्ये काहीसे धक्कादायक निकाल लागताना दिसत आहे. स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात नेहमी वर्चस्व गाजवणारे संघ काहीसे पिछाडीवर पडले आहेत. तर काही संघांनी अनपेक्षितरीत्या आघाडी घेतली आहे. स्पर्धेत आतापर्यंत २५ सामने खेळले गेले असून, त्यात दिल्ली कॅपिटल्स चार पैकी चार सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचे संघ तळाला आहेत.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये तीन कर्णधारांनी विशेष छाप पाडली आहे. तसेच त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्यासोबत आपल्या तडाखेबंद फलंदाजीनेही संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या यादीमधील पहिला कर्णधार आहे तो म्हणजे अजिंक्य रहाणे. आयपीएलसाठी झालेल्या लिलावामध्ये अजिंक्य रहाणेवर सुरुवातीला कुणीही बोली लावली नव्हती. मात्र नंतर तो कोलकाता नाईटरायडर्सच्या संघात दाखल झाला. एवढंच नाही तर त्याच्याकडे संघाचं नेतृत्वही सोपवण्यात आले. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत रहाणेने फलंदाजी आणि नेतृत्व दोन्हीमध्ये चुणूक दाखवली असून, त्याच्या नेतृत्वाखालील केकेआरचा संघ तीन विजय आणि ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रहाणेने सहा सामन्यात २०४ धावा फटकावत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रहाणेने चौथं स्थान पटकावलं आहे.
या यादीमधील दुसरा कर्णधार आहे तो म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं नेतृत्व करणारा रजत पाटीदार. बंगळुरूने जेव्हा कर्णधारपदाची धुरा रजत पाटीदारकडे सोपवली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र रजतने आपलं कुशल नेतृत्व आणि तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर हा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यातत १८६ धावा काढल्या आहेत. तर तीन सामन्यात संघाला विजयही मिळवून दिला आहे. या तीन विजयांसह बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
या यादीमधील तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे श्रेयस अय्यर. यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात पंजाब किंग्सच्या संघाने श्रेयस अय्यर याला तब्बल २६.७५ कोटी रुपये एवढी रक्कम मोजून खरेदी केले होते. पंजाबचा हा निर्णय सध्या योग्य ठरताना दिसत आहे. श्रेयस अय्यर कर्णधार आणि फलंदाज म्हणून संघाला भरीव योगदान देत आहे. त्याने चार सामन्यांमध्ये १६८ धावा काढल्या आहेत. तसेच आयपीएलच्या गुणतक्त्यात पंजाबचा संघ तीन विजय आणि सहा गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.