IPL2025: रिषभ पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर

Rishabh Pant Delhi Capitals, IPL2025: हे तीनही खेळाडू टीम इंडियातील दिग्गज क्रिकेटर आहेत.

गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर दिल्ली कॅपिटल्स संघात गोंधळाचे वातावरण आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगना हटवण्यात आले. आता कर्णधार ऋषभ पंतही दिल्लीचा संघ सोडू शकतो अशी चर्चा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये ( CSK ) जाऊ शकतो. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर पंत हा सक्षम पर्याय ठरू शकतो. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतची जागा व कर्णधारपद घेण्यासाठी तीन खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.

केएल राहुल ( KL Rahul ) या खेळाडूवर दिल्लीचा संघ बोली लावू शकतो. राहुल आणि लखनौ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोएंका यांच्यात सारं आलबेल नाही, अशी चर्चा सुरु आहे. अशा स्थितीत केएल राहुल लखनौचा संघ सोडून दिल्लीचा कर्णधार होऊ शकतो. इतकेच नव्हे तर राहुलला संघात घेऊन कर्णधार करण्यास RCBचा संघही उत्सुक असल्याची चर्चा आहे.

रिषभ पंतच्या जागी सूर्यकुमार यादवही ( Suryakumar Yadav ) दिल्ली कॅपिटल्सच्या नजरेत असेल. सूर्या नुकताच टीम इंडियाचा T20 कर्णधार झाला. तसेच मुंबई इंडियन्सने गेल्याच हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधार केले आहे. अशा वेळी सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडून जाण्याचा विचार करत असल्यास दिल्लीचा संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतो.

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) हा IPL इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याने मुंबईला ५ ट्रॉफी जिंकून दिल्या आणि भारतालाही टी२० विश्वचषक जिंकून दिला. सध्या हार्दिक मुंबईचा कर्णधार असल्याने रोहित वेगळी वाट निवडू शकतो. अशा परिस्थितीत रोहितला दिल्लीचा संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकते.